आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अभ्यासासाठी गावात टीव्ही, मोबाइल दोन तास राहणार बंद

अंबादास जाधव । उमरगा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावोगावी टीव्ही मालिका, मोबाइलमुळे प्रत्येकाचे आयुष्य गुरफटून गेले. याचा परिणाम कुटुंबासह विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी ग्रामपंचायतने गावात दररोज मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा उपक्रम दोन दिवसांपासून सुरु केला. विशेष म्हणजे सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत गावातील आणि घरातील सर्वांचे मोबाइल, टीव्ही बंद ठेवले जात असून भोंग्याच्या माध्यमातून सूचना दिली जात आहे.

नव्या साधनांचा दुष्परिणाम विविध माध्यमातून होताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर जकेकुरवाडीतील युवा सरपंच अमर सूर्यवंशी यांनी यावर एक नवा उपाय शोधला आहे. गावात टीव्ही आणि मोबाइल दररोज दोन तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मुलांच्या अभ्यासासाठी ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दोन अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. मुले तास-तास मोबाइलला चिकटून असतात. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिकांत गुंतून जातात. या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. यावर उपाय म्हणून सूर्यवंशी यांनी गावातील ग्रामस्थांची चर्चा करुन हा सर्वांवर परिणाम करणारा निर्णय घेतला. दररोज नित्यनियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आहे.

ग्रामपंचायत वाजवते रोज सायरन ग्रामीण भागात मुलांना अभ्यासाची सवय लागावी. तसेच टिव्ही व मोबाइल सारख्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. त्यामुळे गावकऱ्यांना आपले टीव्ही, मोबाइल, रेडिओ, लाउड स्पीकर सर्व बंद करायचे व सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे. अशी सूचना आपोआप मिळते.

राज्यातील दुसरा प्रयोग ^असा प्रयोग यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहितेंची वाडी या गावात करण्यात आला आहे. असा उपक्रम राबवणारे हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील जकेकुरवाडी हे राज्यातील दुसरे तर मराठवाड्यातील पहिले गाव ठरले आहे. या उपक्रमास विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. अमर सूर्यवंशी, सरपंच, जकेकुरवाडी.

बातम्या आणखी आहेत...