आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरु करण्यात येऊनही शिक्षण विभागाला त्याची कोणतीच खबर नाही. दुसरीकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी केल्यानंतर बेंबळीत एक शाळा अनधिकृत सुरु असल्याने ती बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी वसुधा साळुंके यांनी देत अनधिकृत शाळेला दणका दिला.
तसेच दुसऱ्या शाळेकडून माहिती मागवली आहे. माहिती नुसार बेंबळी ता. उस्मानाबाद येथे अनधिकृत शाळा सुरु असल्याची तक्रार कलीम शेख यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार त्यावर विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात इकरा इंग्लिश स्कूल,बेंबळी या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा भरवण्यात येत असून हे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले. त्यावरुन शिक्षणाधिकारी साळुंके यांनी शाळेला नोटीस देत थेट शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशात म्हटले की, विना परवानगी सुरु असलेली अनधिकृत शाळा चालवणे कायद्यानुसार अमान्य आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील नियम १८ मधील पोटनियम पाच मधील तरतुदीनुसार अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड व सुचना देऊनही शाळा बंद न केल्यास दहा हजार रुपये प्रतिदिवशी इतका दंड ठोठावण्याची तरतूद आहे. त्यानुसार आपण तत्काळ शाळा, वर्ग बंद करावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस आपण जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
ग्रा.पं. च्या आदेशाने शाळा सुरु
बेंबळीतील दुसरी शाळा आयडीयल नॉलेज फाॅर चिल्ड्रन स्कूल येथील शाळेची ही चौकशी करण्यात आली. यात पूर्वप्राथमिकचे वर्ग ग्रामपंचायत बेंबळी यांच्या परवानगीने सुरु असल्याचे समोर आले. हे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतल्याची प्रत मागवली आहे. तसेच विलंब झाल्यास ती जबाबदारी शाळेवर असणार असल्याचेही पत्रात स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.