आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक कामांवरील मजुरांना दोन वेळा ऑनलाइन हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. राज्य सरकारने एक जानेवारीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सार्वजनिक स्वरूपाच्या कामांवरील मजुरांना दोन वेळा ऑनलाइन हजेरी द्यावी लागत आहे. या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. रोहयोच्या कामावरील मजुरांच्या ऑनलाइन हजेरी मुळे बोगस मजुरांना चाप बसून कोट्यावधी रुपयांच्या होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे संकेत मिळत आहे.
तालुक्यात ७४ ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेत रस्ते या सारखी सार्वजनिक स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली होती. ही कामे करताना मजुर ऐवजी जेसीबीच्या साह्याने करुन बोगस मजुरांचे हजेरी पत्रक दाखल करत लाखो रुपये हडपण्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या.
परंतु आता नवीन शासन परिपत्राकामुळे या गोष्टींना लगाम लागत आहे. आता नवीन नियमांमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत च्या सार्वजनिक कामांवरील मजुरांची ऑनलाईन हजेरी थेट कामाच्या ठिकाणावरून मोबाईल मधील नॅशनल मॉनिटरिंग सिस्टिम या अॅप मधून नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतच्या रोजगार सेवकांनी नॅशनल मॉनिटरिंग सिस्टिम मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून आता रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या मजुरांची दिवसातून दोन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या कामामधील भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
शासनाच्या या नियमांमुळे रोजगार हमीचीच बोगस कामे करणाऱ्यांना ठेकेदारासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेला मोठा फटका बसणार आहे. रोहयो च्या कामावरील मजुरांना २५६ रुपये मजुरी दिली जात आहे. सद्या तालुक्यासह जिल्ह्यातही गोठे, वैयक्तिक सिंचन विहिरी, शेत रस्ते, फळबाग लागवड आदी कामे सुरू आहेत. या ऑनलाइन हजेरी मुळे आता बोगस मजुरांना आळा बसणार आहे.
बोगस कामांना आळा बसणार...
तालुक्यात रोहयो च्या कामावरून मजुरांची संख्या काही प्रमाणात रोडावलेली दिसून येत आहे. तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमध्ये रोहयो ची ९१ कामे सुरू आहे. या कामांवर ६०७ मजूर आहेत. तालुक्यात सद्यःस्थितीत १५ शेत रस्ते कामावर २२३ मजुरांनी कामाची मागणी केली आहे. परंतु आता नविन ऑनलाईन हजेरी मध्ये प्रत्यक्ष कामावरील मजुरांची नोंदणी किती होईल हे पुढील आठवड्यात कळणार आहे. तालुक्यात वैयक्तीक पातळीवरील २९ विहिरीवर २०८ मजूर, घरकूल ३० सुरु असून यावर १२१ मजूर आहेत. तसेच १७ गाय गोठे चालू असून या कामावर ५५ मजूर आहेत.
वैयक्तिक कामांना नसेल ऑनलाइन हजेरी
सार्वजनिक कामावर दोन वेळा ऑनलाइन हजेरी घेण्यात येत असली तरी वैयक्तिक स्वरूपाच्या घरकूल, गाय गोठा व विहिरीच्या कामांवरील मजुरांना मात्र, ऑनलाइन हजेरीतून सूट देण्यात आली आहे. पाणंद रस्ते आदी सार्वजनिक स्वरूपाच्या कामांवर असणाऱ्या मजुरांची उपस्थिती यावर नोंद होणार आहे. त्यासाठी ''मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.