आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान पद उपाध्ये मंडळ भूषविणार असून मंदिर संस्थानच्या शुक्रवारच्या (दि. ०२) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत शाकंभरी नवरात्रातील सिंहासन महापुजेसह सुवासिनी पास, प्रक्षाळ पास, चरण तीर्थ पास आदींवर चर्चा करण्यात आली.
मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीत व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, महंत तुकोजी बुवा, हमरोजी बुवा, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, नागेश शितोळे यांच्यासह पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयानुसार या वर्षीचे यजमान पद उपाध्ये पुजारी मंडळाकडे देण्यात आले आहे. गेल्या वर्षी यजमान पद पाळीकर पुजारी मंडळाने भुषविले होते. नवरात्रात पाळीकर पुजारी मंडळाला १८ सिंहासन महापुजा, उपाध्ये पुजारी मंडळाला १७, भोपे पुजारी मंडळाला १६ सिंहासन महापुजा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय जलयात्रा वेळेत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
घटस्थापना ३० डिसेंबर, जलयात्रा ३ जानेवारीला
तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास ३० डिसेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे तर ०६ जानेवारी २०२३ शाकंभरी पोर्णिमेला दुपारी पूर्णाहुती ने शाकंभरी नवरात्राची सांगता होणार आहे. तत्पूर्वी २३ डिसेंबर ला सायंकाळी नवरात्रापूर्वीचा मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. महोत्सवातील प्रमुख आकर्षण जलयात्रा ३ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.
यजमानपदाला महत्त्व
यजमान पदाबाबत काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. यावेळी तीन्ही पुजारी मंडळे यजमानपदासाठी आग्रही होते. त्यावेळी हा वाद धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात गेला. त्यावेळी चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा निकाल दिला. घटस्थापना, यज्ञ यजमान, प्रक्षाळ, चरतिर्थ पूजा, धुपारती, अभिषेक पूजा, छबिना आदी सर्व पुजासाठी यजमानाला मान दिला जातो. यामुळे याला महत्त्व असते. यामध्ये यजमान पूजारी सपत्निक सर्व विधी करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.