आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:खरीप पीक विम्यावर त्वरित निर्णयाची मागणी

लोहारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप पीक विमा २०२१-२२ च्या संदर्भात विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे मागील सात महिन्यांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या फाइलवर त्वरित निर्णय होण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खरीप २०२१ - २२ मधील पीक विम्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ लाख ६७ हजार २८७ अर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यासाठी ३ लाख ४८ हजार ७४७ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र होते. त्यासाठी शेतकरी, राज्य शासन, केंद्र शासन यांच्याकडून विमा हप्त्यापोटी कंपनीला ५८१ कोटी ३६ लाख रुपये जमा झाले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान, जोखीम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने ३ लाख ४४ हजार ४६९ पूर्व सूचना दिल्या होत्या.

त्यापैकी २ लाख ८१ हजार १२२ पूर्वसूचना पात्र करण्यात आल्या. उर्वरित ६३ हजार ३४७ पूर्वसूचना अपात्र करण्यात आल्या. त्यासाठी कंपनीने वेगवेगळी कारणे दिली आहेत. पात्र केलेल्या २,७४,२५२ नुकसानीच्या पूर्व सूचनांसाठी शेतकऱ्यांना कंपनीकडून ३८८ कोटी ५८ लाख वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ६८७० सूचनांचे अंदाजे ३५ कोटी ९६ लाख वितरित करणे बाकी आहे. याचा अर्थही सर्व मिळून रक्कम ४२२ कोटी ५४ लाख इतकी आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनामधील २५.५.१० सूचनांचा आधार घेत बजाज अलायन्स पीक विमा कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्केच रक्कम वितरित केलेली आहे.

विमा भरपाईच्या आकडेवारीनुसार विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा भरपाई देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी कंपनीला तसे सांगून ११ फेब्रुवारी २०२२ मधील बैठकीत कृषी अधीक्षक उस्मानाबाद यांना आदेश देऊन कंपनीविरुद्ध विमा रकमेबाबत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार कृषी अधीक्षकांनी कंपनीकडे तातडीने प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त यांना योग्य त्या सूचना देऊन जिल्ह्यातील खरीप २०२१-२२ चे पीक विमा प्रकरण निकाली काढण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...