आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मजागर:उस्मानाबादेतील दिगंबर जैन मंदिरात उद्यापासून वेदी प्रतिष्ठा महोत्सव सुरू; कलशारोहण, विश्वशांती महायज्ञ महोत्सवाचेही आयोजन

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुजर गल्ली येथे १०० वर्षांपूर्वीच्या श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात शुक्रवार (दि. ८)पासून तीन दिवस वेदी प्रतिष्ठा महोत्सव सुरू होत आहे. येथे मूलनायक भगवान आदिनाथ स्वामी तसेच भगवान पार्श्वनाथ स्वामी, भगवान महावीर स्वामी व इतर भगवंतांच्या मूर्ती विराजमान आहेत.

सुरुवातीच्या काळात या मंदिरास शिखर बांधले गेले नव्हते. याचबरोबर १०० वर्षाहून जास्त काळ झाल्यामुळे याची वास्तूही जीर्ण होत आली होती. या सर्व कारणांमुळे विश्वस्त मंडळ व गावातील सर्व श्रावकांनी मंदिर जिर्णोधार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. ३०/०६/२०१४ रोजी प.पु.१०८ संयमसागरजी महाराज यांच्या पवित्र सानिध्यात भगवंतांच्या सर्व मूर्ती स्थलांतरित करून मंदिर जीर्णोद्धारास सुरुवात झाली. मंदिराचे सर्व बाह्यकाम बन्सीपहाड या लाल दगडाच्या साह्याने व आतील काम संगमरवराच्या सुबक कलाकृतीने करायचे योजिले. या कामासाठी वापरात येणारे संपूर्ण दगड व मार्बल राजस्थानवरून मागवण्यात आले आहे. नवीन मंदिर वास्तुकलेचा एक उत्तम नमूना असून, शिखराची उंची जमिनीपासून ५० फूट आहे.

शिरपूर नाशिक येथून बाल ब्रम्हचारी (बा.ब्र.) अजय भैय्याजी आणि सांगली येथून बा.ब्र. अजित भय्याजी यांची प्रतिष्ठाचार्य म्हणून तर मध्य-प्रदेश येथून अहमेन्द्र जैन यांची संगीतकार म्हणून निवड करण्यात आली आहे. जैन परंपरेनुसार या प्रतिष्ठा महोत्सवास अनन्यसाधारण महत्व असून, इंद्र-इंद्रायणी, अष्टकुमारिका, सुवर्ण सौभाग्यवती, लोकांतिक देव, भोजन दातार, अष्टद्रव्य दातार अशा निरनिराळ्या पदांवर जैन समाजातील अनेकांनी सहभाग नोंदवला आहे.

८, ९ व १० एप्रिल २०२२ या तीन दिवसांत संपन्न होणाऱ्या या महोत्सवास पहिल्या दिवशी ध्वजारोहण, घटयात्रा होणार असून, पुढे धार्मिक पूजा, अभिषेक, यज्ञ, विधान, आचार्य-भक्ती, संगीतमय आरती, मंगल प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच १० एप्रिल रोजी जिनबिंब (मूर्ती) प्रतिष्ठा, कलशा-रोहण, ध्वजारोहण आणि उस्मानाबाद शहरातून शोभायात्रा संपन्न होईल.

जीर्णाेद्धार केलेल्या वास्तूत भगवंतांची प्रतिष्ठापना
सदरील मंदिराचा वेदी प्रतिष्ठा, कलशारोहण आणि विश्वशांती महायज्ञ महोत्सव २०२२ येत्या ८,९ व १० एप्रिल रोजी संपन्न होत आहे. समस्त जैन समजाच्या मदतीने साकारलेल्या एक अप्रतिम मंदिर वास्तू मध्ये भगवंतांना विराजमान केले जाणार आहे. या महोत्सवास परम पुज्य (प.पु.) मुनिश्री १०८ महानसागरजी महाराज, प. पु. मुनिश्री १०८ विदितसागरजी महाराज आणि प.पु. माताजी संघाचे सानिध्य लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...