आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:उस्मानाबादेत ओमराजे-राणांची शाब्दिक चकमक

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित पीक विम्यासंदर्भातील बैठकीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हॉलमध्ये तुळजाभवानी विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटीलही उपस्थित होते.

पुन्हा काही वेळातच खासदार राजेनिंबाळकर तेथे आले. त्यांनी अगोदर शेतकऱ्यांना बोलून थेट हॉलमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. “बैठकीला सर्व लोकप्रतिनिधींना का बाेलावले नाही, सत्ताधारीच लोकप्रतिनिधी का आहेत, स्वत:ला विम्याच्या विषयात ज्ञानी समजणारेच का येथे आहेत, आम्हाला का बोलावले नाही?’ असे प्रश्न विचारले. डॉ. ओम्बासे यांनी अजून बैठकच सुरू झाली नसल्याचे सांगितले. तसेच ही बैठक प्रशासकीय स्तरावरचीच आहे, असे सांगितले. तसेच आमदार पाटलांनी बैठक मी वेगळी बोलावली असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला.

पुन्हा राजेनिंबाळकर यांनी आमदार पाटील यांचे नाव न घेता अन्य आमदारांना का बोलावले, असे विचारले. तेव्हा संयम बाळगून असलेले आमदार पाटीलही आक्रमक झाले. “तक्रार निवारण समितीचीच बैठक पुन्हा आहे रे बाळा,’ असे उत्तर दिले. तेव्हा खासदार राजेनिंबाळकरही एकेरी येत “नीट बोल, संस्कार व औकात दाखवू नका’ असे म्हणत प्रत्युत्तर दिले. तेव्हा पाटील यांनीही “तू बाळच आहेस रे बाळा’ असे म्हटल्यावर पुन्हा राजेनिंबाळकरांनी संतापून चांगलेच बोल सुनावले. तेव्हा डॉ. ओम्बासे यांनी पाटील यांना शांत राहण्याची विनंती करत खुणावले. नंतर राजेनिंबाळकरांचे समाधान केले. तेव्हा अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदार पाटील बैठकीतून बाहेर पडले.

बातम्या आणखी आहेत...