आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:मुळज येथील ग्रामदैवत जटाशंकर यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात; असंख्य भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम

​​​​​​​उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर तीर्थक्षेत्र यात्रा महोत्सवाला शनिवार (दि. २) पासून सुरुवात झाली. गुढीपाडव्या दिवशी काठीचे मानकरी सोयराप्पा परिवाराच्या हस्ते काठीचे प्रतिष्ठापनेने करण्यात आली. या निमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन राज्याच्या सीमावर्ती भागातील लाखो भक्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व प्राचीन उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर मुळज गावात आहे. या मंदिरात प्राचीन काळापासून सुरू असलेली देवस्थानची यात्रा गुढीपाडव्यापासून सोयराप्पा (बिराजदार) घराण्याचा मानाच्या काठीची प्रतिष्ठापना करून होते. शनिवारी (०९) दुपारी शिव-पार्वती विवाह सोहळा झाला. शुक्रवारी (१५) रोजी छबिना व चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी १६ एप्रिलला सकाळी मंदिरापासून मानाची काठी व श्रीच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गांवरून बँड, नगारे, ढोल-ताशा, हलगी, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

गावातील ठराविक ठिकाणी दहीहंडी काला, भारूड, पोवाडे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तर रविवारी (१७) देवस्थान परिसरात नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. यातील सर्व विजेत्या मल्लांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सोमवारी (दि. १८) पहाटे श्रीची महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा महोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती तथा जि.प.चे माजी सभापती अभय चालुक्य, किल्लारी शेतकरी कारखान्याचे चेअरमन बाबा पाटील, महंत गोविंदगीर महाराज, सरपंच सौ सुनिता वडदरे, उपसरपंच प्रविण शिंदे, सोसायटी चेअरमन बालवीर शिंदे, व्हॉइस चेअरमन सतीश जाधव, काठीचे मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनानंतरचा उत्साह
दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य कार्यक्रम, यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला होता. या दोन वर्षांत कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून मानकऱ्याच्या हस्ते धार्मिक विधीतून पार पडले होते. सध्या प्रशासनाने कोरानाचे सर्व निर्बंध उठवले असल्यामुळे यंदाच्या वर्षी शनिवारी काठी प्रतिष्ठापनेने यात्रेची सुरुवात झाली आहे. यात्रा काळात दररोज भजन, कीर्तन आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...