आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्वच्छता अभियान:ग्रामस्थांनी कचरा गोळा करून केली नाल्यांची सफाई, जकेकूरवाडी चकाचक

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जकेकूरवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून ‘माझा गाव सुंदर गाव’अभियान सुरू करण्यात आले आहे. रविवारी (दि.६) सरपंच अमर सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामस्वच्छतेस सुरुवात केली. संपूर्ण गाव झाडून स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांनी कचरा गोळा केला, नाल्यांची साफसफाई केली, कचरा कुंड्या साफ केल्या. गावातील ज्येष्ठ व युवकांनी गावापासून दोन किलोमीटरपर्यंत लागवड केलेल्या ११०० नारळाच्या सभोवती झालेला कचरा काढून सफाई करत औषध फवारणी केली.

या ग्रामस्वच्छता अभियानात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. दरम्यान, तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मागील २० दिवसांपासून गावात सामाजिक, आर्थिक शैक्षणिक सर्व्हे करत आहेत. तेही ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झाले. गावात सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहे. १२ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकसहभागातून कायापालट ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावाचा कायापालट केला आहे. गावात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, गावातील घरे, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. गावात १०० टक्के कर वसुली होत आहे. वन्य जीवांसाठी पाणवठा, शाळेसाठी क्रीडांगण उभारले आहे. तसेच गावात एक हजार नारळाच्या झाडांची लागवड केली. गावात विधायक उपक्रम राबवून आदर्श गाव निर्माण करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...