आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शाळा बुधवारपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध अधिकारी जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणार आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच शाळेची गोडी लागण्यासाठी चैतन्यमय वातावरण तयार करण्यात येणार आहे. अगोदरच ३५०० माता पालक संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी जागृती करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून १८ हजार ४३३ नव विद्यार्थ्यांपर्यंत शाळाच पोहोचली आहे.
शिक्षकांनी शाळापूर्व तयारी केली. दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना बुधवारपासून बोलावले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी तयारीसाठी शालेय प्रशासनाला सूचना केल्या. विशेष काही पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांची पथक तयार केले आहे. यात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींचा समावेश आहे.
सर्व अधिकारी प्रत्यक्ष जमेल तितक्या शाळांमध्ये जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणार आहेत. यासाठी शाळेत उद्बोधन व प्रबोधन करण्यात येणार आहे. नवीन प्रवेशित व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवसापासूनच चैतन्यमय वातावरण तयार करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. पुस्तके व शालेय उपयोगी साहित्यही देण्यात येणार आहे. शालेय समिती व स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून अन्य उपयोगी साहित्य उपलब्ध करून वितरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात पहिला दिवस जावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
माता पालक गटाच्या माध्यमातून जागृती
कोरोनाच्या दोन वर्षात विद्यार्थी व शाळेत समन्यवय राहिलेला नव्हता. यामुळे माता पालक गटांची स्थापना करण्यात आली. असे ३५१५ गट स्थापन करण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून पालकांना संपर्क साधण्यात आला आहे. गटाच्या प्रमुखपदी मातांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना स्मार्ट माता गट लीडर, असे संबोधण्यात आले आहे. अशा लीडरची ३४५९ संख्या आहे.
विद्यार्थ्यांना आणणार किमान पातळीपर्यंत
गत २ वर्षात कोरोनामुळे शाळेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना किमान शिक्षणही अवगत झालेले नाही. विद्यार्थ्यांना किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी यापुढे प्रयत्न होणार आहेत. यासाठी शालेय समिती सदस्य, पालक, शिक्षकांशी विचारविमर्ष करून अध्ययन निष्पत्तीच्या उपाययोजना लागू करणार आहेत. यासाठी सेतू अभ्यासक्रम व अन्य शैक्षणिक साधानांनी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी नियोजन
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठीही नियोजन केले. पुढील काही दिवस नजिकच्या परिसरातील दगडखानी, वीट भट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने, कुटीर उद्योग, कामगार वस्ती आदी ठिकाणी सर्वेक्षण करून ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश झाल्याची खात्री करण्याच्या दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.