आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जागा देता का जागा..?, नगरपालिकेचा 14 कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प रखडला, नैसर्गिक ऊर्जा मिळाल्यास पालिकेचे दरमहा 1 कोटी वाचतील

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे ऊर्जेची प्रचंड मागणी वाढत असताना वीज तुटवड्याची समस्या काळोख निर्माण करू पाहत आहे. सध्या वेगवेगळ्या भागात वीज भारनियमनाचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक म्हणजे सोलर आणि हवा (पवन) या स्त्रोतांतून ऊर्जा निर्मितीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. उस्मानाबाद नगरपालिकेला अटल अमृत योजनेतून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे १४ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, पंपिंग स्टेशनच्या ५ ठिकाणी पालिकेला जागा हवी आहे. ही जागा मिळत नसल्याने पालिकेचे वीजबिलासाठी महिन्याला ९५ लाख रुपये खर्च होत आहेत. परिणामी विकासकामांवर मर्यादा येत आहेत.

उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने उजनी प्रकल्प, तेरणा व रूईभर प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केला. यापैकी उजनी व तेरणा प्रकल्पातून शहराला सातत्याने पाणीपुरवठा होतो. तर रूईभर प्रकल्पातून गरजेनुसार पाणी उपसा सुरू आहे. उजनी पाणीपुरवठा योजना सुमारे १०८ किलोमीटर अंतराची असल्याने व योजनेसाठी पालिकेने ३ ठिकाणी पपींग स्टेशन उभारल्याने वीजबिलाचा मोठा भार पालिकेवर येत आहे. उजनी प्रकल्पावर तसेच खांडवी पंपींग स्टेशन येथे शक्तीशाली विद्युतपंप आहेत. तसेच उस्मानाबाद शहराजवळील हातलाई परिसरात पंपींग स्टेशनला मोठ्या प्रमाणात विजेची गरज लागते.तेरणा प्रकल्पावरून उस्मानाबादला येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठीही पालिकेवर विजबिलाचा मोठा भार आहे.

तिन्ही योजनेवरील पाच पंपींग स्टेशनसाठी दरमहा ६० लाख रुपये वीजबिल येते तसेच उस्मानाबाद शहरातील पथदिव्यांवर, पालिकेच्या इमारतीमधील विजबिलावर पालिकेचे ३० ते ३५ लाख रुपये खर्च होतात. उत्पन्नाचा निम्म्याहून अधिक भाग म्हणजे एक कोटीपर्यंत विजबिलांवर खर्च करणाऱ्या पालिकेच्या खर्चाचा भार दरवर्षी वाढतच असून, त्यामुळे अन्य विकास कामे करताना पालिकेची दमछाक होत आहे.त्यामुळे सौरऊर्जेवर पंपींग स्टेशन चालविण्याचा शासनाचा निर्णय आहे.

५ वर्षांपूर्वी आला सौऊर्जेसाठीचा निधी
नगरपालिकेच्या वीजबिलामध्ये बचत व्हावी, यासाठी अटल अमृत योजनेतून सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये मंजूर आहेत. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७-१८ मध्ये ही रक्कम आली असून, केवळ जागा उपलब्ध नसल्याने सौर प्रकल्प राबवण्यात आला नाही.पालिकेला तेरणा व रूईभर प्रकल्पावर जागा मिळू शकते, मात्र उजनी प्रकल्पावरील तिन्ही पंपिंग स्टेशन परिसरात जागा मिळणे अडचणीचे ठरत आहे.

जागेचे भाव कोटीत : पंपिंग स्टेशन परिसरात सौर ऊर्जेसाठी किमान प्रत्येकी २ एकर जागेची गरज आहे. उस्मानाबाद शहराजवळील हातलाई पंप हाऊस परिसरात जागेचे भाव कोटींमध्ये आहेत.तशीच परिस्थिती उजनी प्रकल्प परिसरात आहे. शासनाने अमृत योजनेतून सौर प्रकल्पासाठी निधी दिला असला तरी सौर प्रकल्पाला लागणारी जागा मात्र पालिकेने द्यावी, असे अभिप्रेत आहे.मात्र, कोटींच्या भावात असलेली जागा पालिका खरेदी करू शकत नाही, त्यामुळे सौर प्रकल्पाचे काम रखडले आहे.

बातम्या आणखी आहेत...