आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही:जिल्हा बँकेत हप्ते भरलेल्या 1780 शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीशी चर्चा करणार

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विमा हप्ता भरलेल्या १७८० शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नसल्याने खरीप २०२० चा विमा नाकारण्यात आला. या शेतकऱ्यांनाही विमा मिळण्यासाठी संबंधित बजाज अलियांझ कंपनीशी चर्चा करण्याची ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

पंढरपूर येथील कार्यक्रम आटोपून कृषिमंत्री सत्तार औरंगाबादकडे जाताना उस्मानाबाद येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने २०२० खरीप हंगामातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कंपनीला विमा रक्कम देणे अपरिहार्य आहे. जिल्हा बँकेत हप्ता भरलेल्या संबंधित शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या मुद्यावरुन विमा नाकारला असल्यास न्यायालयाच्या निर्णयानुसार कंपनीला असे करता येणार नाही. याप्रश्नी विमा कंपनीशी चर्चा करणार. कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहे. आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जितका निधी दिला नाही तितका अधिक निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दिला आहे.

गोगलगायींमुळे नुकसान झाल्यामुळे सुरुवातीला ९७ कोटी रुपये व नंतर सततच्या पावसामुळे ७६४ कोटी तर ५० हजार प्रोत्साहन अनुदानापोटी ३५०१ कोटी निधी उपलब्ध केला आहे. भूविकास बँकेतील कर्जदारांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्याचे पुत्र आहेत. ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत. त्यांना शेतीतील चांगले ज्ञान आहे. पप्पू नंबर दोन प्रमाणे ते कारभार करत नाहीत. यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहेत.

जुने एनडीआरएफचे नियम बदलण्याची गरज कृषीमंत्री सत्तार म्हणाले की, एनडीआरएफमधून मदत देण्यासाठी निकष व नियम फार जुने आहेत. सध्या परिस्थिती खूपच बदलली आहे. यामुळे केंद्र सरकारकडे याचा फेरविचार करण्याची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर एनडीआरएफमधून अत्यंत कमी मदत मिळते. जुने नियम असल्यामुळेच हा प्रकार घडत आहे. सध्या काही मुद्यांवर चर्चा पूर्ण झाली असून यामध्येही यश मिळेल, अशी आशा आहे.

विनाकारण बदनामी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची विनाकारण बदनामी करण्यात येत आहे. कोणी खोके दिले नाहीत, ना कोणी धोका दिला नाही, जनतेची कामे होत नसल्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही फारकत घेतली. ग्रामपंचायतीचे सदस्य फुटल्यावर पक्ष विचार करतो, आता तर ४० आमदार १२ खासदार सोडून गेले. त्यांनी आपली साथ का सोडली, याचा विचार त्यांनी करावा. विनाकारण बदनामी करू नये, असेही सत्तार म्हणाले.

आमदार कैलास पाटलांच्या आंदोलनाचे स्वागतच आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण केले होते. जो शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो, त्याचे मी स्वागतच करत असतो. यामुळे मी त्यांच्या आंदोलनाचे स्वागतच करतो. त्यांच्या आंदोलनाच्या अगोदरपासून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. पीकविमा कंपनीकडे राहिलेली विम्याची सर्व रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. लवकरच केंद्र सरकारशी बोलून यावर सुद्धा तोडगा काढण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...