आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:लिंगायत समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र करणार; काकासाहेब कोयटे यांचा इशारा

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंगायत समाजाच्या ओबीसी आरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. समाजाची मागणी बेदखल केली जात आहे. यामुळे लिगायत समाज संघर्ष समिती आरक्षणाचा लढा तीव्र करणार आहे, असा इशारा लिंगायत समाज संघर्ष समितीचे राज्य समन्वयक काकासाहेब कोयटे यांनी दिला. मन्मथ स्वामींच्या पावन सहवासाने पुणित झालेल्या कळंब येथे यासाठी लवकरच राज्यस्तरीय बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार, असेही ते म्हणाले.

आंदोलनाची माहिती देण्यासाठी कोयटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी समितीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, राज्य संघटक गुरूनाथ बडुरे, मराठवाडा अध्यक्ष उदय चौंडे, उपाध्यक्ष शिवानंद कथले, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण उळेकर आदी उपस्थित होते. कोयटे म्हणाले की, राज्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या ९२ लाख आहे. समाजाला राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी नांदेड येथे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत २००० ला लाखो लोकांच्या उपस्थितीत भव्य अधिवेशन घेण्यात आले होते. त्यावेळी काही मागण्या मंजूर करण्यात आल्या. समाजाची मुख्य मागणी आरक्षणाची होती. यामुळे २०१४ ला मुंबई येथे संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावी कराड येथे सहा दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तेंव्हा लिंगायत वाणी समाजास ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले. परंतु हिंदू-लिंगायत असा उल्लेख असलेले प्रमाणपत्र आणि आरक्षणाचा लाभ मिळत नाही.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लाखो समाजबांधव या सवलतींपासून वंचित आहेत. शासनाने शुद्धीपत्रक काढून ही अडचण दूर करावी, अशीही मागणी त्यावेळी त्यांनी केली. पूर्ण आरक्षण मिळण्यासाठी लढा समिती तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेरोजगारांना व्यापारासाठी मदत : बेरोजगार युवक युवतींची संख्या समाजात वाढत आहे. त्यांना सध्या कोणतेही आर्थिक महामंडळ उपलब्ध नाही. यासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून यामध्ये ५०० कोटी रुपयांची तरतुद करण्याची मागणी आहे. तसेच समाजातील समृद्ध व्यापारी वर्गाच्या माध्यमातून बिझनेस हब स्थापण करून बेरोजगारांना व्यापारासाठी मदत देण्यात येणार असल्याचेही कोयटे यांनी सांगितले.

स्मारकासाठीही लढा : शासनाने मंगळवेढा येथे स्मारकासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती गठीत केली. या समितीत संघर्ष समितीच्या पाच पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. स्मारकासाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावी, महात्मा बसवेश्वरांचे विचार नवीन पिढीला समजण्यासाठी तातडीने स्मारक उभे करण्यासाठीही लढा देण्यात येणार असल्याचे कोयटे यांनी सागितले. उस्मानाबाद येथील जंगम मठाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमाणाचाही प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

३५२ उपजातींना एकत्र घेणार
यावेळी काेयटे यांनी सांगितले की, लिंगायत समाजाच्या तब्बल ३५२ पोटजाती राज्यात आहे. त्या सर्वांना व त्यांच्या सर्व संघटनांना एकत्रित करून आरक्षणासाठी लढा उभारण्यात येणार आहे. विविध संघटनांचे विविध विचार आहेत. वेगळी उद्दिष्ट आहेत. परंतु, त्यांच्या त्या विचार व उद्दिष्टांमध्ये ढवळाढवळ न करता केवळ आरक्षण, समाजाच्या हितासाठी संघर्ष समिती त्यांना एकत्रित करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...