आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. बुधवारी महिला दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत दारूबंदीचा दुसऱ्यांचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, गावात दारूबंदीसाठी महिलांनी पोलिस प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अपसिंग्यात अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाच्या कृपाशिर्वादाने देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री सुरू आहे.
यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. गावात दारूबंदीचा निर्धार करत यापूर्वी महिलांनी प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत ठराव घेतला होता. परंतु गावात दारू विक्री सुरूच असल्याने महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामसभेत दुसऱ्यांचा दारूबंदीचा ठराव घेतला. याप्रसंगी सरपंच अजित क्षीरसागर, उपसरपंच राहुल साठे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, महिला सदस्या प्रयागबाई गोरे, मीरा क्षीरसगार, सोनाली पांचाळ, रतनबाई जाधव, रंजनाबाई रोंगे, सुरेखा गोरे, दीलपाक जनार्दन आदींसह गावातील शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिसांची दांडी
अपसिंगा ग्रामपंचायतीत यापूर्वी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेऊन पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग व तुळजापूर पोलिस ठाण्याला निवेदन दिले होते. तरीही गावात दारूबंदी झाली नाही. त्यामुळे महिलांनी बुधवारी महिला दिनी दुसऱ्यांदा दारूबंदीचा ठराव घेतला. या ग्रामसभेत ग्रामपंचायत व महिला पोलिसांना जाब विचारणार होत्या. त्यामुळे सभेला हजर राहण्याबाबत पोलिस प्रशासनाला कळवूनही त्यांनी सभेला दांडी मारली.
... तर ठाण्यावर धडक
अपसिंगा ग्रामपंचायतीने बुधवारी गावात दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावातील महिलांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या आठ दिवसात दारू बंद न केल्यास तुळजापूर पोलिस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. - अजित क्षीरसागर , सरपंच, अपसिंगा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.