आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लेकी देताहेत माहेरासाठी ‘ऑक्सिजन’; शेलगाव येथे बहरली वृक्षसंपदा; उस्मानाबाद जिल्ह्यातील लेकींचा उपक्रम

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: चंद्रसेन देशमुख
  • कॉपी लिंक

सासुरवाशिणींना नेहमी माहेराविषयी आपुलकी असते. यातूनच ४० लेकींनी स्वत:च्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवसाला माहेरात येत वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला व गावात वृक्षसंपदा बहरू लागली. कळंब तालुक्यातील शेलगाव (जहागीर) या गावात लेकींच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे. या प्रयत्नातून आजवर ७५ झाडे लावण्यात आली. गावाला हरित बनवण्याचा मुलींचा संकल्प आहे. शिवाय गावात सुसज्ज ग्रंथालयही त्यांच्या पुढाकारातून उभारले जाणार आहे. तीन हजार लोकसंख्येच्या शेलगावात दोन महिन्यांपूर्वी वृक्ष लागवडीच्या या उपक्रमाला सुरुवात झाली.

गावची लेक असलेल्या सुवर्णा मधुकर शिनगारे-जावळे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून आल्या. शेलगावपासून त्यांचे सासर हळदगाव हे गाव अवघे पाच किलोमीटर अंतरावर आहे. दररोज सासर-माहेर असा संपर्क येत असल्याने माहेरासाठी काहीतरी विधायक कार्य उभारण्याची संकल्पना त्यांच्या मनात होता. त्यातून गावात वृक्षलागवडीची संकल्पना त्यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी गावातल्या भावांना आणि सासुरवाशीण झालेल्या सर्व मुलींना ‘जाणीव जागर’ नावाच्या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित आणले.

प्रत्येक लेकीचा वाढदिवस माहेरात झाडे लावून झाला पाहिजे, ही संकल्पना सगळ्या जणींना आवडली. कुणी स्वत:च्या तर कुणी कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसाला शक्य तेवढ्या पैशातून वृक्ष लागवड करू लागल्या. स्वातंत्र्यदिनी व दरम्यानच्या काळात वाढदिवस असलेल्यांनी रविवारी (दि.१५) अंगणवाडी आणि समाजमंिदर परिसरात ३१ झाडे लावली. हा परिसर गजबजून गेला आहे. या उपक्रमासाठी सुवर्णा शिनगारे, पंकज शिनगारे, पांडुरंग सोनार, योगेश शिंदे, संगीता काळे, वैभव शिनगारे, तन्वी मोरे, समृद्धी अवताडे, धीरज बांगर, स्वराज तवले, रणजित तवले, मंगल तवले, सुदाम शिनगारे, विकी शिनगारे, सीमा मुळे, प्रमोद तवले आदी उपस्थित हाेते.

अंगणवाडीचा परिसर नटला
वृक्षारोपण मोहिमेत सहभागी गावच्या ४० लेकींमध्ये कुणी डॉक्टर, कुणी नोकरदार तर कुणी उद्योजिका आहेत. लेकींच्या आणि गावातील तरुणांच्या पुढाकारातून आतापर्यंत अंगणवाडी, गावातील हनुमान मंदिराचा मुख्य चौक, समाजमंदिरासह गावातील मोकळ्या जागांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी आतापर्यंत १७ जणांनी योगदान दिले आहे.

ग्रंथालय उभारणार
गावात आता सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी गावातल्या भिंती बोलक्या केल्या जाणार आहेत. पुस्तक वाचनाचे महत्त्व काय आहे, याबद्दलची जागृती या भिंतींवर केली जाणार आहे. ग्रंथालयाचे महत्त्व गावकऱ्यांना कळावे, असा त्यामागचा उद्देश आहे. - सुवर्णा शिनगारे-जावळे.

बातम्या आणखी आहेत...