आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजून महिना अर्धा संपला तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करुन ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने ईटसह परिसरातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला तर शंभर टक्के पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येते. मात्र गेल्या तीन वर्षात मृग नक्षत्रात पाऊस झालेला नाही. मागील तीन वर्षात पाऊस कधी लवकर तर कधी उशिरा येतो अन् पेरण्यांनंतर पावसाचा खंड पडतो. यंदाही जूनचा पंधरवडा उलटला तरी दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.
गेल्या चार दिवसापूर्वी पहिल्यांदा चांगला पाऊस झाला, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. यावर्षी ईट परिसरात अद्याप एकही दमदार पाऊस झाला नाही. दरम्यान, पावसाअभावी खरीप पेरणी खोळंबली आहे. जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी तरी मुबलक पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतजमिनी तयार केल्या आहेत. मात्र पावसाचे रोहिणी नक्षत्र पाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे जात आहे. परिणामी यंदा खरीप हंगामात दमदार पावसाअभावी जमिनी पडीक राहतात की काय, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. दरवर्षी मृग नक्षत्रापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडत असतो. यंदा मात्र बेमोसमी पावसानेही पाठ फिरवली आहे.
पावसाच्या आशेवर मे महिन्यातच तयारी
चांगल्या पावसाच्या आशेवर परिसरातील शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. मात्र आता जून महिना अर्धा संपत आला तरी परिसरात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाचा एकही थेंब नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. दरवर्षी ईट परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरिपाची पेरणी करण्याचा अधिक कल असतो.
पहिल्या आठवड्यात पेरणी झाल्यास चांगला उतारा
वेळेवर पाऊस झाल्यास सात जूनच्या आसपास, मूग, उडीद, तूर, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झाल्यास शेतमालाचा उतारा चांगला येतो, असा अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र, या वर्षी सात जूनच्या पेरणीचा मुहूर्त हुकल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
दररोज ऊन-सावलीचा खेळ
दररोज सकाळी सोसाट्याचा गार वारा, दुपारी कडक ऊन, सायंकाळी पावसाचे दाटून आलेले काळे ढग आणि रात्री आकाशात टिपूर चांदणे पडत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ऊन-सावलीच्या खेळाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागील वर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले होते. परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर हाती आलेल्या थोड्याशा उत्पन्नावर शेतकऱ्यांनी कसेबसे वर्षे कडेला लावले.
बाजारपेठेत शुकशुकाट, उलाढाल ठप्प
पाऊस पडताच पेरण्या करून खते देण्यासाठी शेतकरी खतांची खरेदी करतो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल खतांच्या बाजारपेठेत होते. ही बाजारपेठ जून महिना सुरू होऊनही शांत-शांत आहे. बियाणे, खते विक्रेत्यांना पाऊस पडल्यानंतर बोलायला वेळ नसतो एवढे ग्राहक त्यांच्याकडे असतात. पावसाळी रेनकोट, छत्र्या, टोपी, महिलांसाठीचे वेगळे रेनकोट, लहान बालकांसाठी वेगळे रेनकोट यांना प्रचंड मागणी असते. या वस्तूंच्या बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. पाऊस नसल्यामुळे कृषी सेवा दुकान व बाजारपेठेत मध्ये शांतता दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.