आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमबाह्य:दहिवडी, सावरगाव शिवारातून अन्यत्र विद्युतप्रवाह नेण्यासाठी काम सुरू; सौरऊर्जा कंपनीने परवानगी न घेता उभारले शेतांमध्ये मनोरे नुकसान

तामलवाडी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी व सावरगाव शिवारात सौरऊर्जा कंपनीने शेतकऱ्यांची परवानगी न घेता शेतात अनधिकृतपणे अतिक्रमण करत शेतीची बांधबंदिस्ती मोडून विद्युत मनोरे उभारले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून एनरिच एनर्जी प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

सावरगाव व दहिवडी शिवारात सौर ऊर्जा कंपनीची कामे सुरू असून विद्युत निर्मिती करण्यासाठी दोन्ही गावच्या शिवारात संबंधीत कंपनीने शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जमिनी विकत घेत त्यावर सौरऊर्जा निर्मिती करणारे पॅनल बसवले आहेत. मागील चार-पाच महिन्यांपासून दहिवडी व सावरगाव शिवारातून दुसरीकडे विद्युत प्रवाह नेण्यासाठी विद्युत मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंपनीने ठराविक शेतकऱ्यांना विद्युत मनोऱ्यांचा मोबदला दिला आहे.

मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना मोबदला न देता त्यांच्या शेतात अनधिकृतपणे अतिक्रमण करून शेताची बांधबंदिस्ती मोडून विद्युत मनोरे उभारले जात आहेत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. दहिवडी शिवारातील नानासाहेब दादाराव निंबाळकर यांची शेतजमीन (गट क्र. ३५०) मध्ये कोणतीही परवानगी न घेता व पूर्वकल्पना न देता विद्युत मनोरा उभारला आहे. त्यांच्याच दुसऱ्या (गट क्रं. २४९) मध्ये जेसीबीने बांधबंदिस्ती मोडून ट्रॅक्टरने जमीन घोटन केली.

सावरगाव शिवारातील कोंडाबाई नवनाथ खंडागळे या निराधार महिलेच्या शेतात अतिक्रमण करून नांगरलेल्या शेतजमिनीवर ट्रॅक्टर फिरवून धुडगूस घातला. सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र दुसरीकडे खासगी कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची बांधबंदिस्ती मोडून जमीन घोटन करणाऱ्या एनरिच एनर्जी प्रा. लि. या कंपनीवर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी तामलवाडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊन केली आहे.

कायदेशीर कारवाई करू
संबंधित कंपनीच्या विरोधात शेतकऱ्याने आमच्याकडे लेखी तक्रार दिली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सचिन पंडित, सहायक पोलीस निरीक्षक

सौरऊर्जा कंपनीला राजकीय नेत्याचे पाठबळ
संबंधित सौरऊर्जा कंपनीला जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याचे समजते. त्या जोरावर कंपनीतील कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धटपणे व मग्रुरीने वागत आहेत. भविष्यात या नेत्याला परिसरातील शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

माहिती न देता शेतात खांब
संबंधित कंपनीचे कर्मचारी दादागिरी करत असून मला कोणतीही कल्पना न देता माझ्या शेतामध्ये त्यांनी खांब उभारले. शेताचे बांध फोडून नुकसान केले. मी एनरिच एनर्जी प्रा. ली कंपनीची पोलिसात तक्रार दिली आहे.
नानासाहेब निंबाळकर, नुकसानग्रस्त शेतकरी

बातम्या आणखी आहेत...