आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैलारपूर येथील खंडोबा यात्रा ही मोठी यात्रा असून या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक लाखोच्या संख्येने दर्शनासाठी येतात त्यामुळे यात्रेच्या काळात श्री खंडोबाचे दर्शन भाविकांसाठी सोयीचे झाले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी नळदुर्ग (मैलारपुर) येथे यात्रेनिमित्त नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजीत केलेल्या बैठकीत बोलतांना केले आहे.नळदुर्ग (मैलारपुर) येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक श्री खंडोबाची यात्रा ५ ते ७ जानेवारी दरम्यान भरत आहे. दोन वर्षानंतर यावर्षी खंडोबाची यात्रा भरत आहे.
त्यामुळे यावर्षी होणाऱ्या या यात्रेमध्ये पाच ते सात लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासन, पोलिस प्रशासन व मंदिर प्रशासनाकडुन यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेसंदर्भात जी नियमावली तयार करण्यात आली आहे त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने २ जानेवारी रोजी मैलारपुर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार सौदागर तांदळे हे होते तर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, महावितरण विभागाचे अभियंता प्रवीण गायकवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहताब शेख,डॉ. महेश पवार, परिवहन महामंडळाचे वाहतुक नियंत्रक महेश डुकरे, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, यांच्यासह नळदुर्ग व अणदूर येथील खंडोबाचे मानकरी,पुजारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना तहसिलदार सौदागर तांदळे यांनी म्हटले की, खंडोबा यात्रेत येणाऱ्या भाविकांना याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नळदुर्ग नगरपालिका, मंदिर समिती तसेच नळदुर्ग-अणदुरकरांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रशासन आपल्या परीने यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. यात्रा शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही तहसिलदार सौदागर तांदळे यांनी केले.
ट्रस्टी कारभाराबद्दल नाराजी
तहसिलदार सौदागर तांदळे यांनी ट्रस्टीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. ट्रस्टीमध्ये तहसिलदारांना घ्यावे असे ठरले होते. .मात्र दीड महिना झाला ट्रस्टीने अद्याप त्याची पुर्तता केली नाही. विरोधात उपोषण सुरू झाले की ट्रस्टीच्या पदाधिकाऱ्यांचे अनेक फोन यायचे. मात्र उपोषण संपल्यानंतर गेल्या दीड महिन्यात ना ट्रस्टीच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला ना ते भेटण्यासाठी आले. ट्रस्टीमध्ये तहसिलदार राहिल्यास कारभारात पारदर्शकता राहते, तसेच देवस्थानचा विकास होतो. त्याचबरोबर लोकांचाही विश्वास वाढतो, असे ते म्हणाले.
मंदिराकडे येणारी वाहतूक सुरू, अवैध धंद्याबाबत पोलिसांचा इशारा
यावेळी बोलतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी म्हटले की यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणेने सर्व तयारी केली आहे. यात्रेत एकही अवैध धंदा सुरू होणार नाही. यात्रेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास न होता त्यांना खंडोबाचे दर्शन व्हावे यासाठी उपाययोजना केल्या आहेत. यावर्षीच्या खंडोबा यात्रेत एकेरी वाहतुक सुरू करण्यात येणार असून नळदुर्ग मार्गे मैलारपुरात येणाऱ्या रस्त्यावरून फक्त मंदिराकडे येणारी वाहतुक सुरू राहील तर बाहेर जाण्याचा मार्ग हा बायपास रस्ता असणार आहे. यात्रा कालावधीत हे दोनच रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील इतर रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रेकरू, भाविक व नागरिकांनी सहकार्य करावे असेही यावेळी सिद्धेश्वर गोरे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.