आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडेश्वरी देवीची यात्रा:माता येडाईच्या पालखीवर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; चैत्री यात्रेसाठी देवीचे आमराईत आगमन

धाराशिव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्र येरमाळा येथील येडाई देवीच्या चैत्री यात्रेला गुरूवारपासून सुरूवात झाली असून, शुक्रवारी सकाळी मातेची पालखी येडेश्वरी मंदिरावरून चुन्याच्या रानात,त्यानंतर आमराईत दाखल झाली.यावेळी चुन्याच्या रानात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने मातेच्या पालखीवर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

देवीचा आमराईत 5 दिवस मुक्काम

तुळजाभवानी देवीची बहिण मानल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीचा चैत्री उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. सबंध महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येरमाळा नगरीत येतात.चुना वेचण्याचा मान असल्याने चुन्याच्या रानात प्रचंड गर्दी होते. यावर्षी दहा लाख भाविकांनी चुना वेचल्याचा अंदाज आहे.तर दिवभरात 15 लाखांवर भाविकांनी देवीचरणी माथा टेकवला. चुन्याच्या रानातून पालखी आमराईत पाच दिवस मुक्कामी असते.

रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह

येडेश्वरीच्या दर्शनासाठी गुरूवारपासूनच गर्दी झाली होती. गुरूवारी दिवसभर लाखो भाविकांनी येडेश्वरीच्या मंदिरावर गर्दी केली. शुक्रवारी दुपारी प्रचंड रखरखत्या उन्हात भाविकांनी चूना वेचला तसेच आमराईत दर्शनासाठी गर्दी केली.यावेळी उन्हातही भाविकांचा प्रचंड, अभूतपूर्व उत्साह होता. यात्रोत्सवामुळे आमराईचा 100 एकराचा परिसर गर्दीने फुलून गेला असून, विविध दुकानांमुळे आर्थिक उलाढाल वाढली आहे.

राजकीय नेत्यांकडून देवीचरणी सेवा

येडेश्वरी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध राजकीय पक्षांकडून नाश्ता, पाण्याची सोय करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनीही भाविकांसाठी व्यवस्था केली आहे.तसेच विविध संस्थांकडून भाविकांना पाणी, नाश्त्याची सोय केली जात आहे.