आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील चिंचपूर (खु) येथील जिल्हा परिषद शाळेचे सह-शिक्षक संजय शिंदे यांनी अवैध सावकारी केल्याच्या कारणावरून झेडपी सीईओ राहुल गुप्ता यांनी निलंबित केले.
परंडा तालुक्यात शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या घटना वाढल्या आहेत. चिंचपुर (खु) केंद्र अंतर्गत आटोळेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे सह शिक्षक संजय शिंदे यांच्यावर सावकारीचा गंभीर आरोप करण्यात आला असून शिंदे यांनी तालुक्यातील अनेक लोकांच्या जमिनी सावकारकी व खासगी अवैध सावकारकीत लिहून घेऊन बेकायदेशीर खरेदी खत नोंद केले आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार अंभी पोलिसात २०१८ मध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक उपनिबंधकांच्या अहवालानुसार जमीन खरेदी विक्रीचे त्याच व्यक्तीने सतत केलेले व्यवहार व खरेदी घेतलेल्या जमिनीचा ताबा न घेता इतर व्यक्तीस विक्री करणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणी सहाय्यक उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षक संजय शिंदे यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला होता. शिक्षक शिंदे यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी २५ मार्च रोजी शिंदे यांना निलंबित केले.
शिक्षण विभागात आठवड्यात दुसरे निलंबन-येथील प्रभारी गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे यांच्यावर विस्तार अधिकारी अनिता जगदाळे यांनी गंभीर खोटे अरोप करीत मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अनिता जगदाळे व त्यांचे पती शिवाजी जगदाळे यांच्यावर परंडा पोलिसात शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ४ एप्रिल रोजी अनिता जगदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.