आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:औरंगाबाद-नगर महामार्गावर तिहेरी अपघातात 7 गंभीर, 22 किरकोळ; वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

वाळूज13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-नगर महामार्गावर वळण घेणाऱ्या इंधनाच्या टँकरला स्कूल बसने पाठीमागून जोराची धडक दिली. या वेळी स्कूल बसच्या पाठीमागील खासगी ट्रॅव्हल्सने देखील बसला धडक दिली. या तिहेरी अपघातात ७ जण गंभीर तर २२ किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांनी घाटीत दाखल केले. अपघातानंतर ३ तास वाहतूक कोंडी झाली होती. साधारण चार किमी ढोरेगावपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. अखेर घटनास्थळावरून वाहने हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

भानसहिवरा येथील ‘ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल’ची बस गुरुवारी देऊळगाव-तरोडी (ता. नेवासा) येथून लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळीला बिडकीनकडे घेऊन निघाली होती. यादरम्यान औरंगाबाद-नगर महामार्गाने बिडकीनच्या दिशेने जात असताना सकाळी १० वाजता इसारवाडी फाटा येथे करमाडच्या दिशेने जाण्यासाठी एक इंधनचे टँकर अचानक वळण घेत होते. या वेळी स्कूल बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने टँकरला जोराची धडक दिली. या वेळी बसच्या पाठीमागून पुणे येथून औरंगाबादच्या दिशेने जाण्यासाठी निघालेली ट्रॅव्हल्स पाठीमागून बसवर जोरात धडकली. सुदैवाने इंधनाचा टँकर पल्टी होऊन गंभीर घटना घडली नाही.

मात्र, या अपघातात स्कूल बस व ट्रॅव्हल्समधील नागरिक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गणेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेतून घाटीत हलवले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेश राऊत, सरपंच जालिंदर राऊत, गणेश खाटके, पांडुरंग भुसारे व महेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर घटनास्थळी वाळूजचे पोलिस दाखल झाले.

अशी आहेत जखमींची नावेयात दुर्योधन भगवान जाधव (४०), शेषराव उत्तम काळे (३६), बाबासाहेब वाल्हेकर (४५), राहुल वाल्हेकर (२८), विनोद धोंडिराम काळे (३०), शिवाजी देवा बोरुडे (५५), कौशल्याबाई उत्तम पथार (५० सर्व रा. देऊळगाव, तरोडी फतेहपूर, ता. नेवासा) यांच्या डोक्याला, हातापायांना जबर मार लागून गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य २२ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...