आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बंब ऑन अ‍ॅक्‍शन मोड:आमदार बंबकडून शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन; 115 पैकी केवळ पाचच गुरुजी मुख्यालयी हजर

वाळूज/ गंगापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांकडून वेतन, भत्ते वसूल करा, शिक्षक- पदवीधरचे मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करणारे आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) गंगापूर तालुक्यातील काही शाळांचे स्टिंग ऑपरेशन केले. वाळूज आणि रांजणगावच्या शाळांना अचानक भेटी देऊन तेथील किती शिक्षक मुख्यालयी राहतात हे तपासले. या पाच शाळातील 115 पैकी केवळ पाचच शिक्षक मुख्यालयी राहात असल्याचे निदर्शनास आले.

त्यांची पाद्यपूजा करुन आमदारांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांना ‘तुमच्या मतदार संघाचे आमदार कोण?’ असे प्रश्न विचारले असता चक्क ‘रामनाथ कोविंद’ अशी उत्तरे आली.

सोमवारी सकाळी 8.30 वाजता आमदार बंब, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक बडे, माजी जि.प. सदस्या उषा हिवाळे, अलीम सय्यद आदींनी वाळूज व रांजणगाव येथील हनमाबाई गोविंदवार, दिपाली मकरंद आणि ननवरे गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन पाद्यपूजा केली. नंतर 10 वाजता वाळूजच्या जिल्हा परिषद शाळेत बंब यांनी भेट दिली. विशेष म्हणजे यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधीही त्यांच्यासोबत होते. येथील विद्यार्थांना सामान्यज्ञान, पाढे आदींबाबत प्रश्न विचारले. बहुतांश विद्यार्थ्यांना प्रश्नांची अचूक उत्तरे देता आली नाहीत. 10.40 वाजता रांजणगाव शेणपूंजी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली. प्राथमिक शाळेत मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तर माध्यमिक शाळेत भेट जाऊन इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, तिथेही वरीलप्रमाणे अनुभव आला.

कोणते प्रश्न विचारले? : पंतप्रधान, राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्रात जिल्हे किती, औरंगाबादमध्ये तालुके किती, आपण कोणत्या खंडात राहतो, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी असते, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी असते आदी प्रश्न बंब यांनी विचारले. यात बरेच विद्यार्थी अडखळले. 9 वीच्या विद्यार्थिंना 24, 26 आणि 28 चा पाढा विचारला, तोही अनेकांना आला नाही.
शिक्षकांना कार्य मुक्त का करू नये? : विद्यार्थांना स्वत:च्या गावचे सरपंच, मुख्यमंत्री, राजधानी कोणती? इतक्या सामान्य प्रश्नांची उत्तरे येत नाहीत. 9 वीच्या विद्यार्थांना लसावी-मसावीचा अर्थ, पाढे येत नसतील तर हे शिक्षक त्यांना काय शिकवतात. या शिक्षकांना कार्यमुक्त का करण्यात येवू नये? भविष्यात मुलाखती घेवूनच शिक्षकांच्या नियुक्ती करायला हवी, असे आमदार बंब म्हणाले.

आमदारांनी स्वत:ला अपडेट ठेवावं

विद्यार्थांनी पाढे तोंडपाठ करणे अपेक्षित नसून कोणत्याही संख्येचा पाढा कसा तयार करावा याबाबतची संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या बहुसंख्य शाळेत सहावी ते आठवीच्या वर्गाला फक्त दोन पदवीधर शिक्षक आहेत. मग गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा कशी पूर्ण होईल? आमदार साहेबांनी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती समजून घेत स्वत:ला अपडेट ठेवण्याची गरज आहे.- राजेश भुसारी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती

तुर्काबाद, वाळूजमध्ये एकही शिक्षक नाही

वाळूज, रांजणगाव शेणगाव पुंजी, तुर्काबाद, अंबेलोहळ येथील शाळांना आमदारांनी भेट दिली. तेथील 115 पैकी केवळ 5 शिक्षक मुख्यालयी राहात असल्याचे निदर्शनास आले. तुर्काबाद येथील 23, वाळूजमधील 31 पैकी एकही शिक्षक मुख्यालयी राहात नाही. रांजणगाव व अंबेलोहळ येथील 30 पैकी केवळ दोनच शिक्षक मुख्यालयी राहात असल्याचे निदर्शनास आले.

बातम्या आणखी आहेत...