आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून झाल्याचा अंदाज:रांजणगावातील पडीक घरात आढळला कुजलेला मृतदेह; खून करुन पोत्यात घालून टाकल्याचा संशय

वाळूजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव शेणपुंजी येथील श्रीरामनगरात अनेक वर्षांपासून पडीक पडलेल्या वाड्यातील एका खोलीत कुजलेल्या अवस्थेतील अज्ञात पुरुषाचा मृतदेह १ जानेवारी रोजी सायंकाळी आढळला. या व्यक्तीचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहरातील कटकट गेट परिसरात राहणाऱ्या बागवानाच्या मालकीचा हा वाडा आहे. मागील काही वर्षांपासून वापरात नसल्याने पडून आहे. या ठिकाणी असणाऱ्या १०- १२ खोल्यांमध्ये लहान मुले खेळण्यासाठी जातात.

शनिवारी सायंकाळी मुले गेली असता त्यांना एका खोलीतून दुर्गंधी आल्याने त्यांनी ही माहिती पालकांना, सरपंच कांताबाई जाधव यांना दिली. अशोक जाधव, दत्तू दिवाळे आदींनी पाहणी करत घटनेची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

खून झाल्याचा संशय : या व्यक्तीचा इतरत्र ठिकाणी खून करण्यात आला. डोक्याकडून व पायाकडून असे दोन पोत्यात मृतदेह घालून येथे आणून टाकला असावा, असे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने साधारण ८ ते १० दिवसांपूर्वी घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनी धाव घेतली होती. मात्र, त्यांच्या हाती कुठलाही ठोस पुरावा लागला नाही. मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे, फौजदार सचिन पागोटे, अविनाश ढगे, डी.एस. खोसरे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...