आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, अजूनही १४.८७ लाख शेतकऱ्यांचे आधार लिंक झाले नसल्याने हे शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. आपले सरकार सेवा केंद्रावर आधार कार्डसाठी गेलेल्या ज्येष्ठ लाभार्थींंमध्ये कोणाचे डोळे मॅच होईनात तर काही शेतकऱ्यांचा संपर्कच होत नसल्याने कृषी खातेही हतबल झाले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून “प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ हाती घेतली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये दिले जात असून यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते पाडण्यात आले आहेत. यासाठी बँक खात्याशी आधार सलग्न असणे गरजेचे आहे. यानुसार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या पत्रातील निर्देशाप्रमाणे प्रधानमंत्री किसान योजनेतील लाभार्थीची बँक खाती गेल्या १५ जुलैपर्यंत आधार संलग्न करण्यासाठी कृषि आयुक्तालयाने सूचित केले होते. मात्र त्यानंतरही १४.८७ लाख लाभार्थींची बँक खाती अद्यापही आधार सलग्न करणे प्रलंबित आहेत.
यानंतर शासनाने डिसेंबर-मार्च २०२२ या कालावधीतील १३ व्या हप्त्याचे वितरणाचे नियोजन करण्यासाठी गेल्या २ डिसेंबर रोजी बैठक बोलावली होती. यावेळी राज्यातील सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी १५ डिसेंबरची मुदत होती. लाभार्थ्यांनी व्यक्तीश: संबंधित बँकेत जाऊन स्वत:चे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते.
क्षेत्रस्तरावरील कर्मचाऱ्यांचा लाभार्थ्यांशी संपर्कच होईना
राज्यातील सर्व जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक व्हावे यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना देेण्यात आल्या होत्या. तलाठी, कृषि सहायक व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून लाभार्थींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काही लाभार्थ्यांचे संपर्कच होत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात १४.८७ लाख लाभार्थी वंचित राहण्याची भीती
बँक खाते आधार लिंक नसल्याने या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असलेले जिल्हानिहाय लाभार्थी असे (संख्या हजारात) - हिंगोली -१५ हजार, परभणी -२४, औरंगाबाद ३२, जळगाव ३८, अमरावती -२८, लातूर २९, बुलढाणा -३६, गोंदिया -२८, नांदेड -५१, यवतमाळ -४१, अकोला -२६, सातारा -५८, नंदुरबार -१५, जालना -४७, वर्धा -२०, कोल्हापूर -६८, बीड -७१, अहमदनगर -८९, गडचिरोली -२२, उस्मानाबाद -४१, भंडारा -३१, वाशीम -२७, नागपूर -३०, ठाणे -२०, नाशिक -७४, धुळे -३१, पालघर -१७, सांगली -८०, सिंधुदुर्ग -२७, चंद्रपूर -५३, रत्नागिरी -५०, रायगड २६ हजार, सोलापूर १ लाख २० हजार, पुणे १ लाख.
डोळे मॅच होईनात, बाेटांचे ठसे येईना
लाभार्थी आधार कार्ड काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर गेले असता काही जणांचे डोळे तर काही जणांच्या हाताच्या बोटाचे ठसेच मॅच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचे आधार कार्ड काढण्यातही अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन केले होते
^शेतकऱ्यांनी बँक खाते आधार लिंक करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. लाभार्थ्यांनीच बँकेत जाऊन ते करणे आवश्यक आहे. बँकांमार्फत यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
- शशीकांत सावंत, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक हिंगोली
माहिती कृषी आयुक्तालयास कळवली
^शेतकऱ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी डोळे मॅच न होणे, बोटांचे ठसे न येणे असे प्रकार होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांशी संपर्क होत नाही. या संदर्भात कृषी आयुक्त कार्यालयास तोंडी माहिती दिली आहे. -शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.