आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात मागील चार वर्षांपासून वृद्ध साहित्यिक कलावंतांची मानधनासाठी निवडच नसल्याने सुमारे १६००० प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे धूळ खात पडले आहेत. त्यामुळे आता समित्या कधी स्थापन होणार अन् निवड कधी होणार याकडे कलावंतांचे लक्ष लागले आहे.शासनाच्या विविध योजनांची माहिती कला पथक, कीर्तनाच्या माध्यमातून कलावंत करीत आहेत. या कलावंतांना शासनाकडून दरमहिन्याला मानधन दिले जाते. त्यासाठी समितीच्या माध्यमातून कलावंतांची निवड करून त्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत प्रस्ताव मागवले जातात. त्यानंतर मानधन निवड समितीच्या बैठकीत या कलावंतांची मानधनासाठी निवड केली जाते.
मात्र मागील चार वर्षांपासून वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन निवड समितीच्या बैठकाच झाल्या नाही. त्यामुळे मानधनासाठी मराठवाड्यातून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेले एकूण १६००० प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे धूळ खात पडले आहेत. कोरोनाच्या काळात समितीच्या बैठका झाल्या नाहीत तर त्यानंतर एकाही जिल्ह्यात मानधन निवड समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे या कलावंतांची मानधनासाठी निवड झाली नसल्याने कलावंतांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून वृद्ध साहित्यिकांमधून समितीच्या बैठकांसाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र निवड समितीच नसल्याचे कारण दाखवून कलावंतांना परत पाठवले जात असल्याने कलावंतांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, समाजकल्याण विभागामार्फत प्रस्ताव सादर झाल्यानंतर निवड समितीची बैठक होते.
या बैठकीमध्ये कलावंतांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेऊन त्यांची मानधनासाठी निवड केली जाते. यामध्ये अ वर्ग कलावंतांसाठी ३१०० रुपये, ब वर्ग साठी २७०० रुपये, तर क वर्ग कलावंतांसाठी २२०० रुपये दर महिन्याला मानधन दिले जाते.
कोण असतात समितीचे अध्यक्ष अन् सदस्य या समितीमध्ये पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार एका कलावंताची मानधन निवड समितीमध्ये अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्यानंतर इतर सहा कलावंतांची सदस्य म्हणून निवड होते, तर जिल्हा परिषदेचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी या समितीमध्ये असतात.
सध्या मिळते ८१०० कलावंतांना मानधन मराठवाड्यात सध्याच्या स्थितीत ८१०० कलावंतांना मानधन दिले जाते. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ८८४, जालना १२०६, हिंगोली ७३७, परभणी १०८३, नांदेड ९१९, बीड१६०७, लातूर ८२२, उस्मानाबाद जिल्ह्यातील ८४७ कलावंतांचा समावेश आहे.
प्रशासनाने तातडीने प्रस्ताव निकाली काढावेत मागील चार वर्षांपासून मानधन निवड समितीची स्थापना झाली नाही. त्यामुळे १६००० प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे धूळ खात पडले आहेत. समिती स्थापन करण्याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही समित्या स्थापन झाल्याच नाहीत. त्यामुळे कलावंत मानधनापासून वंचित असून प्रशासनाने तातडीने प्रस्ताव निकाली काढवेत. - बबन महाराज घुगे, माजी अध्यक्ष, वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन निवड समिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.