आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत पोलिस पथकाची कारवाई:स्वस्त धान्याच्या संशयावरून 197 पोती तांदूळ केले जप्त; अन्य एका टेम्पोचा शोध सुरू

हिंगोली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्वस्त धान्याच्या संशयावरून 197 किलो तांदूळ गुरुवारी (04 ऑगस्ट) पोलिसांनी जप्त केला. तसेच अन्य 200 पोती तांदूळ लोहगाव येथे उतरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी त्या ठिकाणी ही शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील औद्योगिक वसाहती मध्ये दोन आयशर टेम्पो मध्ये स्वस्त धान्याचा तांदूळ आणण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार महेश बंडे, मंडलिक, खोडवे, दांडेकर, सुमित मोडक, वाढवे, चिपडे यांच्या पथकाने आज सायंकाळी औद्योगिक वसाहती मधील एका गोदामावर छापा टाकला.

टेम्पोची केली तपासणी

पोलिसांनी गोदामाची तपासणी केली असता त्यामध्ये स्वस्त धान्याचे 197 पोते तांदूळ आढळून आला. त्या ठिकाणी एक आयशर टेम्पो आढळून आला. याशिवाय त्या परिसरातच असलेल्या एका आयशर टेम्पोची ही पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये स्वस्त धान्याची रिकामी 200 पोती आढळून आली. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने सदर तांदूळ लोहगाव येथे उतरवला असल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने एक पथक लोहगाव येथे रवाना केले आहे. त्या ठिकाणी तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

दरम्यान सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने टेम्पो चालकाची चौकशी सुरू केली असून त्याने सदरील धान्य हिंगोली येथूनच भरून आणल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धान्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणार

पोलिसांनी जप्त केलेल्या या धान्याचे नमुने तपासणीसाठी महसूल विभागाकडे तसेच औरंगाबाद येथे प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

अन्य एका टेम्पोचा शोध सुरू

हिंगोली येथून तीन टेम्पो निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एक टेम्पो थेट लोहगावला गेला एक टेम्पो औद्योगिक वसाहतीमध्ये रिकामा झाला तर एक टेम्पो येत होता मात्र पोलिस आल्यामुळे टेम्पो चालकाने टेम्पोसह पळ काढण्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून पोलिसांनी त्या टेम्पोची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...