आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅकेट सक्रिय:डॉक्टर होण्याचे स्वप्न दाखवत 20 जणांना दीड कोटीचा गंडा

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे येथे मेरिट ब्ल्यू प्रा.लिमिटेड कंपनीने एका ४० मजली इमारतीत पाच खोल्यांत प्रशस्त कार्यालय थाटले होते. कंपनीच्या संचालकांनी राज्यातील २० जणांना सुमारे दीड कोटी रुपयांनी गंडा घातल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नावाखाली पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात आखाडा बाळापूर ठाण्यात कंपनीच्या तीन संचालकांवर ३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज्यभरात अनेकांना गंडा घातला गेल्याचे समोर येत आहे. राज्यात नीट परीक्षेचा अभ्यास केल्यानंतरही मेरिट यादीमध्ये केवळ एका गुणाने मागे पडलेल्या विद्यार्थ्यांनी पेमेंट सीटची वाट धरली होती. विशेष म्हणजे ठाणे येथील मेरिट ब्ल्यू प्रा. लिमिटेड या कंपनीच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना कार्यालयात येऊन संवाद साधण्याचे कळवले. त्यानुसार काही विद्यार्थी व पालक तेथे गेल्यानंतर तब्बल चाळीस मजले असलेल्या इमारतीमध्ये एका मजल्यावर पाच खोल्यांचे प्रशस्त कार्यालय दिसून आले. त्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी व संचालकांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधून त्यांना राज्यात हव्या त्या वैद्यकीय महाविद्यालयात पेमेंट सीटवर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी कंपनीच्या खात्यात ६ ते ७ लाख रुपये प्रति विद्यार्थी भरण्यास सांगितले होते.

दरम्यान, कंपनीचे कार्यालय व संचालकांचा संवाद पाहून भारावून गेलेल्या पालकांनी आता आपला विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार याचे स्वप्न पाहून वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे चेक काढले तर कंपनीच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा केली. मात्र काही दिवसांतच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी ठाणे येथे जाऊन कंपनीचे कार्यालय गाठले. मात्र तेथे तीनही संचालक फरार होते. तर त्या ठिकाणी कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनी संचालकांबद्दल कुठलीही माहिती नसल्याचे सांगून हात वर केले आहेत.

एमबीबीएसचा नाद सोडून बीएएमएसला प्रवेश
मुलगा जितेश यास ५०५ गुण मिळाले होते. मात्र ५०६ वर शासकीय कोटा बंद झाल्यामुळे पेमेंट सीटवर प्रवेश घेण्याचे निश्चित केले होेते. मात्र कंपनीकडून झालेल्या फसवणुकीनंतर बीएएमएसला प्रवेश दिला आहे. राज्यातील बीड, ठाणे, पुणे, मुंबई या ठिकाणच्या सुमारे २० विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे.
- संजय देशमुख, तुप्पा (ता.कळमनुरी)

बातम्या आणखी आहेत...