आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी:सोने लुटण्यासाठी 25 हजार शिवसैनिक मुंबईत जाणार; 200 बसेसची व्यवस्था, आ. बांगरांनी घेतली बैठक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी मुंबईत आयोजित दसरा मेळाव्यास हिंगोली जिल्ह्यातून 25,000 शिवसेना कार्यकर्ते जाणार असून त्यासाठी 200 बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मेळाव्याच्या पूर्व तयारीच्या बैठकीत शनिवारी (01 ऑक्टोबर) दिली.

येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित बैठकीस खासदार हेमंत पाटील, भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम, संजय बोंढारे शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके, राजेंद्र शिखरे, अनिल देशमुख, विजय बोंढारे, पिंटू पतंगे, धनंजय पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

200 बसेसची व्यवस्था

यावेळी आमदार बांगर यांनी मार्गदर्शन केले. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार स्थापन व्हावे ही जनतेची इच्छा होती. मात्र महविकास आघाडी सरकार स्थापन होऊन जनतेचा विश्‍वास घात झाला होता. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे कडवट शिवसैनिक असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर मुंबईत दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून 25,000 कार्यकर्ते जाणार आहेत. या कार्यकर्त्यांसाठी जिल्हाभरातून 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

सज्ज राहण्याचे आवाहन

जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या शहरातून या बसेस नेल्या जाणार आहेत. ता. 04 ऑक्टोबर रोजी या बसेस रवाना होणार आहेत. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन आमदार बांगर यांनी केले. मेळाव्याला जाण्यासाठी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खासदार पाटील, आमदार मुटकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...