आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली तालुक्यातील वरूड गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन शिक्षक व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर घेतली व ग्रामपंचायतीच्या निधीतून वॉटर फिल्टर देण्यात आल्याने ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळू लागले आहे.
हिंगोली तालुक्यातील येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळेमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच बाटल्यांमधून पाणी भरून आणावे लागत होते. दुपारच्या सुटीत शाळेच्या परिसरात असलेल्या घरांमधून पाणी मागावे लागत होते. विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याअभावी मोठी गैरसोय होत होती. दरम्यान, उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन मुख्याध्यापक सुभाष जिरवणकर यांनी विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी शाळेतील शिक्षक व गावकऱ्यांना लोकवर्गणीबाबत आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला शिक्षक व गावकऱ्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. ५० हजारांवर रक्कम जमा झाली.
यामध्ये शाळेतील शिक्षक शिवाजी देशमुख, संजय मुधोळ, साहेबराव दिपके, फुलचंद महाजन, गोविंद चुनडे, संगीता देशमुख, संगीता नवखेकर, करुणा वाठोरे, सरपंच ज्योती बद्री खांडेकर, उपसरपंच शेख मुन्नुभाई, पांडुरंग खांडेकर, शेख ख्वाजा, जयाजी मापारी व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सोनटक्के यासह गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा केली. या लोकवर्गणीतून मागील महिन्यात शाळेच्या परिसरात घेण्यात आलेल्या विंधन विहिरीला मुबलक पाणी लागले. त्यानंतर ग्रामपंचायतीने शाळेमध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले. या वॉटर फिल्टरद्वारे हँडवॉश स्टेशनमधून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
शाळा परिसरही हिरवाईने नटणार
शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या विंधन विहिरीला मुबलक पाणी लागल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यासोबतच आता शाळेच्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध झाल्याने शाळेचा परिसर हिरवाईने नटणार आहे. - सुभाष जिरवणकर, मुख्याध्यापक.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.