आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्न:खासगी टँकरच्या 600 कोटींच्या खर्चाची आता होणार चौकशी

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात टंचाईच्या काळात मागील पाच वर्षांत खासगी टँकरवर झालेल्या सुमारे ६०० कोटींच्या खर्चाची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांमधून तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत झालेल्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे सादर केला जाणार आहे. या चौकशीमुळे खर्चातील अनियमितता उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यात कोविडच्या कालावधीतील दोन वर्षे वगळता पाच वर्षांत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी भरमसाट टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियानासह पाणी बचतीबाबत इतर अभियान राबवूनदेखील टंचाईकाळात पाणीप्रश्न कायम राहिला होता. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईमध्ये गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती टाळण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये खासगी टँकरची संख्याही अधिक होती.

दरम्यान, सन २०१७ ते सन २०२१-२२ या कालावधीत खासगी टँकरवर झालेल्या खर्चामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. त्यानुसार या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यात चौकशी करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार मराठवाड्यातही चौकशी केली जाणार आहे. या पाच वर्षांच्या काळात खासगी टँकरवर तब्बल ६०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चाची चौकशी करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली असून या पथकांमार्फत चाैकशी केली जाणार आहे.

किती झाला खर्च मराठवाड्यात सन २०१८-१९ या काळात खासगी टँकरसाठी ९५ कोटी रुपये, सन २०१९-२० या कालावधीत ३०३ कोटी रुपये, सन २०२०-२१ या कालावधीत १८४ कोटी रुपये तर सन २०२१-२२ या कालावधीत २ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

काय होणार चौकशी मराठवाड्यात टँकरने पाणीपुरवठा करताना योग्य निकष पाळण्यात आले होते का, निविदा प्रक्रिया राबवली काय तसेच टँकरने पाणीपुरवठा करताना त्यांनी किती खेपा केल्या, शासकीय दरानुसार एका खेपेसाठी किती पैसे आकारले आदी प्रमुख बाबींची चौकशी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...