आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीन महिन्यांमध्ये अपघातात 7 जणांनी गमावला जीव; पोलिसांनीच ‘ब्लॅक स्पाॅट’ शाेधत रस्त्याची केली दुरुस्ती

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा ते जवळाबाजार मार्गावर मागील तीन महिन्यात लहान-मोठे २० अपघात झाले आहेत. यात सात जणांचा मृत्यू झाला. तसेच २२ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या मार्गावरील अपघातप्रवण जागा शोधून काढल्या असून तेथे दुरुस्ती सुरू केली आहे. पोलिस अधिकारी स्वत: हजर राहून दुरुस्तीचे काम करून घेत आहेत.

जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हिंगोली ते रिसोड, हिंगोली ते कनेरगाव नाका तसेच औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर अपघातांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षासंदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. ब्लॅक स्पॉट निवडून तातडीने दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या.

हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर जवळाबाजार शिवारातील वळणावर होणारे अपघात टाळण्यासाठी पुलाच्या कठड्यांची दुरुस्ती करून इतर कामे सुरू करण्यात आले. यावेळी हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे यांनी थांबून दुरुस्ती करून घेतली.

आवश्यक कामांच्या सूचना
^जिल्ह्यातील अपघातांची संख्या लक्षात घेता पोलिस विभागाकडून सुरक्षा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ब्लॅक स्पॉट निवडून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून आवश्यक कामे करून घेतली जात आहे. तसेच यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम अधिक गतिमान केली जाणार आहे.
- राकेश कलासागर, पोलिस अधिक्षक, हिंगोली.

बातम्या आणखी आहेत...