आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

- शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ग्‍वाही:जिल्हा परिषदेच्या 70 हजारांवर शाळांत सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ७० हजार शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून गणवेश दिला जाणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी दिली आहे.

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून गणवेश वाटप केले जातात. अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी तसेच सर्व विद्यार्थिनींना गणवेश दिले जातात. त्यासाठी शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी दिला जातो. त्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात नसल्याने शाळास्तरावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना अडचणी येत होत्या. ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाहीत त्या विद्यार्थ्यांना शाळेत आपल्या जातीची जाणीव होते. त्यामुळे लहान वयात जातीचे बीज मुलांच्या मध्ये पेरले जात असल्याचे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे म्हणणे होते. याबाबत पालकांमधूनही तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधून सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याकडे केली होती.

शाळा व्यवस्थापन समितीकडे रक्कम वर्ग केली जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने झाली आर्थिक तरतूद क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिक्षणमंत्री केसरकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. सर्वच विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाच्या मागणीचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात येईल व गणवेशासाठी आर्थिक तरतूद अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याचे जिरवणकर यांनी सांगितले.

नव्या शासन निर्णयाची प्रतीक्षा राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा झाली आहे. मात्र या संदर्भात अर्थ विभागाची मान्यता घेऊन नवीन शासन निर्णय काढावा लागणार आहे. या शासन निर्णयाची शैक्षणिक वर्तुळाला प्रतीक्षा लागली आहे. याबाबतचा लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवशी गणवेश मिळणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये दिले जाणार असून सदर रक्कम शिक्षण विभागामार्फत शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केली जाणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...