आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी अडचणीत:हिंगोलीत 8 गावांमधील केळी बागांना वादळी वाऱ्याचा तडाखा; तब्बल 500 हेक्टरवरील 80 कोटींचे पीक उद्धवस्त

हिंगोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने गुरुवारी (ता. 9) सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. प्राथमिक सर्वेक्षणानुसार 500 हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या पिकांचे तब्बल 80 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी व्यक्त केला आहे.

वादळी वाऱ्यामुळे झाले नुकसान

वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरात केळीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या परिसरातील केळीला नांदेड व इतर बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या केळीचे घड काढण्यासाठी आले असून काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत केळी खरेदीचा सौदा देखील केला होता. मात्र बुधवारी (ता.8) दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी केळीचे घड खाली पडले असून झाडेदेखील तुटून पडली आहेत.

महसूल यंत्रणेकडून सर्वेक्षणाचे काम सुरू

दरम्यान, आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अरविंद बोळंगे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांच्यासह महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळपासून प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास सुरवात केली आहे. या पथकाने कुरुंदा, गिरगाव, खाजमापूरवाडी, दाभडी, सोमठाणा, परजना या भागात पाहणी केली असता सुमारे 450 ते 500 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 400 शेतकऱ्यांचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे बोळंगे यांनी सांगितले.

या संदर्भात प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याचे काम सुरु असून नुकसानीचे क्षेत्र व झालेले नुकसान याची अंतिम आकडेवारी शुक्रवारपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे महसुल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हाती आलेले पिक गेल्याने शेतकरी अडचणीत

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पथकासमोर व्यथा मांडल्या. शेतात केळीचे घड काढणीच्या अवस्थेत असून काही व्यापाऱ्यांनी सौदे देखील केले आहेत. कधी नव्हे ते केळीला 19 ते 21 रुपये किलोचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पाणी फेरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची प्रतिक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...