आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नातून विषबाधा:93 जण रुग्णालयात, कळमनुरीचे नागरिक इसापूर येथे विवाह सोहळा आटोपून आले होते परत

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी अन्नातून विषबाधा झालेले ९३ रुग्ण सोमवारी दाखल झाले आहेत. रात्री नऊ वाजेपर्यंत रुग्ण येणे सुरूच होते. यामध्ये ७ लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.

कळमनुरी येथील मदिनानगर, नुरी मोहल्ला भागातील नागरिक सोमवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजता विवाह सोहळा आटोपल्यानंतर भोजन करून कळमनुरी येथे परत आले होते. मात्र दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळ्यात भोजन केलेल्या नागरिकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे साडेचार वाजता एक रुग्ण कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्या रुग्णावर उपचार सुरू करण्यापूर्वीच इतर रुग्ण येण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने यांनी तातडीने या प्रकाराची माहिती शासकीय रुग्णालयास दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. गोपाल कदम यांनी तातडीने पथक तयार करून कळमनुरी येथे पाठविले. त्यानंतर डॉ.मेने व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार सुरू केले. रात्री ९ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात ६१ रुग्ण दाखल झाले होते.

तर अद्यापही रुग्ण येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. तर ३२ रुग्ण कळमनुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.या रुग्णांमध्ये ७ लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...