आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत अवघे 7 टक्के पीककर्ज वाटप:लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्याला बँकाकडून केराची टोपली; ऐन पेरणीत शेतकऱ्यांना लागला घोर

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटप करणाऱ्या बँकांवर कारवाई करू, पक्षाच्या स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यांना बँकांनी चक्क केराची टोपली दाखवली आहे. बँकांकडून केवळ 7 टक्केच कर्ज वाटप झाल्यामुळे बँका लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचे चित्र आहे.

हिंगोली जिल्हयात यावर्षी खरीप हंगामात 810 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला 139 कोटी रुपये, राष्ट्रीयकृत बँकेला 521 कोटी रुपये तर मराठवाडा ग्रामीण बँकेला 149 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. साधारणतः एप्रिल व मे महिन्याच्या अखेरपर्यंत पीक कर्ज वाटप होणे अपेक्षित आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदीसाठी करणे सोयीचे होण्याची अपेक्षा होती.

मात्र, हिंगोली जिल्हयात आतापर्यंत केवळ 7 टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. हिंगोली जिल्हयात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 5567 शेतकऱ्यांना 21.18 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकेकडून 2072 शेतकऱ्यांना 22.20 कोटी रुपये तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 1554 शेतकऱ्यांना 13.55 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. बँकेकडून पीक कर्ज वाटपाचे 100 टक्के उदिष्टपूर्ण होण्याची आशा धुसर होऊ लागली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील पीककर्ज वाटप आजची परिस्थिती लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच बँकांना कडक इशारा दिला. बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटप न केल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. विशेष म्हणजे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनीही पीककर्ज वाटप बाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधींच्या आंदोलनाचा इशारा याला बँकांनी सपशेल केराची टोपली दाखवली असून आतापर्यंत केवळ सात टक्के कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे 100 तर नाही पण 50 टक्के पीक कर्ज वाटप होईल की नाही याबाबत शंकाच आहे.

मागील वर्षी लोकप्रतिनिधींनी पीक कर्ज वाटप बाबत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. त्यावेळीही आंदोलनाचे इशारे देऊन झाले होते. मात्र, बँकांनी ही या विषयांकडे दुर्लक्ष करून केवळ 6 टक्केच कर्ज वाटप केले. कमी प्रमाणात कर्जवाटप झाल्यानंतरही लोकप्रतिनिधींनी आंदोलन केलेच नाही. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा इशारा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जाऊ लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामात 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बँकांनी 77152 शेतकऱ्यांना 516 कोटी रुपयांचेच कर्ज वाटप झाले होते.

बातम्या आणखी आहेत...