आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या नावाने फसवणूक:ठाण्यातील कंपनीच्या 3 संचालकावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी जळगाव येथील महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देण्याचे अमिष दाखवून तुप्पा (ता.कळमनुरी) येथील विद्यार्थ्याची ६ लाख रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी ठाणे येथील मेरीट ब्लू प्रा. लिमीटेड या कंपनीच्या तीन संचालकांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. ३ सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथील जितेश संजय देशमुख यास नीट परिक्षेमध्ये 505 गुण मिळाले होते. मात्र त्याला शासकिय कोट्यातून वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्याने पेमेंट सीटवर प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याच्याशी ठाणे येथील मेरीट ब्लू प्रा. लिमीटेड कंपनीच्या संचालकांनी संवाद साधून त्यास जळगाव येथील वैद्यकिय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी एक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

त्यानुसार जितेश व त्याचे वडिल संजय देशमुख हे ठाणे येथे गेले असता त्या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या संचालिका शोभा राठोड, हिमांशी पाटील व संचालक करणसिंग बघोरीया यांची भेट घेतली. यातिघांनी संजय देशमुख व जितेश याचे समुपदेशन करून त्याला जळगाव येथे एमबीबीएस वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली.

वैद्यकिय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असल्याने संजय देशमुख यांनी ता. 25 मार्च 2022 रोजी डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेतून 6 लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली. मात्र त्यानंतरही त्याला प्रवेश मिळालाच नाही. त्यानंतर त्यांनी पैसे घेण्यासाठी ठाणे गाठले असता त्या ठिकाणी कंपनीही नाही व संचालकही नाही असे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय देशमुख यांनी आज सायंकाळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शोभा राठोड, करणसिंग बघोरीया, हिमांशी पाटील यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड, उपनिरीक्षक एस. के. वाघमारे, जमादार रविकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक?
या कंपनीच्या संचालकांनी राज्यातील सुमारे 50 ते 60 विद्यार्थ्यांची वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे अमिष दाखवून पैसे लुबाडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सुमारे 1 ते दीड कोटी रुपयांची आर्थिक लुट झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...