आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातपात की, अपघात?:सेनगाव तालुक्यातील बरडा येथे पूलाखाली आढळला मृतदेह अन् दुचाकी; मृताची ओळख पटेना

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील बनबरडा शिवारात एका पुलाखाली असलेल्या पाण्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह रविवारी (ता. 7) सकाळी दहा वाजता आढळून आला. विशेष म्हणजे मृतदेहाच्या बाजुलाच पाण्यात दुचाकी असून सदर दुचाकी अकोला पासींगची आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले आहे.

सेनगाव तालुक्यातील बनबरडा शिवारात सरस्वती नाला आहे. या नाल्याच्या पुलावरूनच शेतकरी शेतात ये जा करतात. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुलाच्या पाण्यात दुचाकी आढळून आली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बाजूला पाण्यातच एका तरुणाचा मृतदेह देखील आढळून आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावकरी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच सेनगावचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, सतिष ठेंगे, जमादार अनिल भारती, सुदर्शन खाडेकर, जिवन मस्के यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, सदर मृतदेहाजवळ असलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून सदर दुचाकी अकोला पासींगची असून त्याचा क्रमांक (एमएच-30-एम-1272) असल्याचे सुत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे पुलाच्या वर रस्त्यावर रक्त सांडलेले असल्यामुळे त्या तरुणाचा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटविण्यास सुरवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...