आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू:घरातला कर्ता गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर; दोघांना कारणे दाखवा नोटीस

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली वसमत तालुक्यातील वापटी येथे विहीरीत पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याला पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी नसल्याने वेळेत मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (01 सप्टेंबर) रात्री घडली. पांडूरंग नागोराव पानपट्टे (32) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

काय आहे घटना?

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वापटी येथील शेतकरी पांडूरंग नागोराव पानपट्टे हे गुरुवारी सायंकाळी शेतात फवारणीचे काम करत होते. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते विहीरीवर गेले असता त्यांचा पाय घसरल्याने ते विहीरीत पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मात्र, पंधरा ते वीस मिनीटानंतरही पांडूरंग हे पाणी घेऊन कसे आले नाही हे पाहण्यासाठी इतर शेतकरी विहीरीकडे गेले असता पांडुरंग विहीरीत पडलेले दिसून आले. त्यांना विहीरीबाहेर काढून उपचारासाठी पांगरा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

डॉक्टरांवरती आरोप

शेतकरी पांडुरंग पानपट्टे हे शेतात काम करत असताना विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांचा पाय घासरून ते विहिरीत पडले. त्यांना विहिरीत पडतांना पाहून शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले. तसेच त्यांना पुढील उपचाराकरिता नजीक असलेल्या पांगरा शिंदे येथील प्राथमिक केंद्रात हलवले. मात्र केंद्रात डॉक्टर हजर नसल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित वैद्यकीय अधिकारी बराच वेळ होऊनही हजर होत नसल्याने, नातेवाईकांनी वासमत तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. वैद्यकीय अधिकारी पाठवले, पण तोपर्यंत उशीर झाला होता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घरातील कर्ता गेला

पोलिसांनी गावकरी व नातेवाईकांना शांत करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. काळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर रात्री उशीरा कुरुंदा प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी पाठवून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मयत पांडूरंग पानपट्टे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्‍चयात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

या प्रकरणात पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश चिटमोगरेकर, डॉ. ओंकार महाजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- डॉ. संदीप काळे, तालुका आरोग्य अधिकारी, वसमत

बातम्या आणखी आहेत...