आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:हिंगोलीच्या दगडगाव शिवारात गावठी कट्ट्यासह तरुणाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील दगडगाव शिवारात एका तरुणाच्या झडतीमध्ये गावठी पिस्टल आढळून आले असून या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 31 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पिस्टल जप्त केले असून मॅग्झीन मात्र रिकामे होते. मागील चार दिवसांत पिस्टल जप्त करण्याची दुसरी कारवाई आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील रेल्वेस्थानक भागातील रहिवासी राजूसिंग लखनसिंग चव्हाण (20) याच्याकडे गावठी पिस्टल असून तो सतत सोबत बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार संभाजी लकुळे, भगवान आडे, राजू ठाकुर, विठ्ठल काळे, सुनील टाले, प्रमोद थोरात यांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला होता.

दरम्यान, राजूसिंग हा दगडगाव शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी त्या शिवारात जाऊन शोध मोहिम हाती घेतली. यावेळी ते दगडगाव ते म्हातारगाव चौकात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल आढळून आले.

मात्र पिस्टल मधील मॅग्झीन रिकामे होते. पोलिसांनी पिस्टल जप्त केले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपीनवार यांच्या तक्रावरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, उपनिरीक्षक संदीप यामावर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी मागील चार दिवसांत जप्त केलेले दुसरे गावठी पिस्टल असून यापूर्वी कळमनुरी येथील एका तरुणाकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे.