आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:10 दिवसांत राज्यातील 95 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 हजार रुपयांचा पहिला हप्ता देणार- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

प्रतिनिधी | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील 10 दिवसांत 95 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होईल, अशी महत्त्वाची माहिती कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिली आहे.

नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय

हिंगोली येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राज्यसरकारकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 73 टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईबाबत कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार आहेत.

खतांचा पुरेसा साठा

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे, शेतकऱ्यांची कुठेही पिळवणूक होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी मुंबई व पुणे येथे स्वतंत्र दक्षता पथक स्थापन केले आहे. हे पथक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गोपनीय पध्दतीने त्या दुकानांवर छापे टाकणार आहेत. हंगामासाठी खताचा पुरेसा साठाही असल्याचे, मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलेे.

केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना मदत

अब्दुल सत्तार म्हणाले, केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाकडूनही 6 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. यामध्ये केवायसी झालेल्या ९५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार रुपयांचा पहिला हप्ता पुढील 10 दिवसांत जमा केला जाणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर लगेचच अनुदानाची रक्कम दिली जाईल.

युतीचे नेतृत्व एकनाथ शिंदेंकडेच

राज्याचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची महाशक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. युतीसाठी आगामी २०२४च्या निवडणुकांचे नेतृत्वही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून करतील. जयंत पाटील यांच्या वक्तव्याला २०२४च्या निवडणुकीनंतरच उत्तर मिळेल, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी अभ्यास समिती

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न व त्यांची सोडवणुक करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील? यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. एक समिती १०० दिवसांत अहवाल देणार असून दुसरी समिती ४५ दिवसांत अहवाल देणार आहे. या अहवालानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उपाय योजना केल्या जातील.