आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना दाखवले काळे झेंडे:हिंगोलीत स्वाभिमानी संघटेचे आंदोलन, पीकविम्यासाठी उपोषण सुरू

प्रतिनिधी | हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
तहसील कार्यालयासमोर 18 जानेवारीपासून पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु आहे. - Divya Marathi
तहसील कार्यालयासमोर 18 जानेवारीपासून पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, या मागणीकडे शासनासोबतच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला आहे.

स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना खैरखेडा पाटीजवळ काळे झेंडे दाखवले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही करण्यात आली.

3 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला

हिंगोली जिल्हयातील सुमारे ३ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकविमा काढला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिक हाती आलेच नाहीत. शिवाय प्रशासनाच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सोबतच जिल्हयातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत आली आहे.

रवीकांत तुपकर यांचे आंदोलन

दरम्यान, पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागील वर्षीचे राहिलेले १३.८९ कोटी तसेच यावर्षीची रक्कम तातडीने अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते रवीकांत तुपकर यांनी हिंगोलीत आंदोलन केले. त्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने १५ दिवसांची मुदत मागितली होती.

तहसील कार्यालयासमोर उपोषण

मात्र, या मुदतीत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गोरेगाव (ता.सेनगाव) अप्पर तहसील कार्यालयासमोर १८ जानेवारी पासून उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भगवती येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी सत्तार हिंगोलीत

दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही शासनाला तसेच प्रशासनाला जाग येत नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पालकमंत्री अब्दूल सत्तार हे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी सिल्लोड येथून हिंगोलीत येणार असल्याचे समजताच खैरखेडा पाटीजवळ कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी पालकमंत्री सत्तार यांना काळेझेंडे दाखवून निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.

बातम्या आणखी आहेत...