आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन:हिंगोलीतील प्रकार, वैद्यकीय तपासणी करत असतानाच दिला चकमा

प्रतिनिधी | हिंगोली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरसी नामदेव पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या आरोपीने प्राथमिक आरोग्य केंद्रातून पोलिसांना चकमा देत पलायन केले. याप्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

जीवे मारण्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील पुसेगाव येथे किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून एका व्यक्तीस जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून नरसी नामदेव पोलीस ठाण्यामध्ये तिघा जणांवर सोमवारी (ता. ७) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा काढला पळ

पोलिसांच्या पथकाने या प्रकरणात प्रवीण सुभाष देशमुख व अन्य दोघांना अटक केली होती. या तिघांना नरसी नामदेव पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नरसी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी दुपारी नेले होते. त्या ठिकाणी आरोपींचे रक्त नमुने तपासासाठी घेतले जात होते. मात्र, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवीण देशमुख यांनी पोलिसांना चकमा देत पळ काढला.

शोध सुरू

आरोपी प्रवीण पळाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. या प्रकाराची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापासून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या नातेवाईकांकडेही पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नाही.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक रामराव पोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. आज सकाळपर्यंत त्याचा कुठेही शोध लागला नसल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...