आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात मान्सूनच्या काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीची मदत मिळावी यासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर मधील संपर्क यंत्रांची तातडीने दुरुस्ती करून यंत्र सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.
मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये अनेक वेळा नदी व नाल्याचे पुराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याशिवाय पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी व शेतमजूर अडकल्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारी केली जाते.
यावर्षीही मराठवाड्यात जिल्हा प्रशासनाने सोबतच जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक कार्यालयांना मान्सूनपूर्व तयारी बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा स्तरावरील सर्व खाते प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय जिल्हा नियंत्रण कक्षातील 1077 हा टोल फ्री नंबर तातडीने सुरु करावा, पूर बचाव साहित्याची साठवणूक, देखभाल-दुरुस्ती याबाबत खबरदारी घ्यावी, जिल्ह्यातील आपत्तीप्रवणता लक्षात घेऊन रंगीत तालीम घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात उद्भवणार्या वेगवेगळे आपत्ती विचारात घेऊन आपत्तीपूर्व आपत्ती दरम्यान व आपत्ती पश्चात काय करावे व काय करू नये याविषयी प्रत्येक गावात जनजागृती करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.
जिल्ह्याच्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर मध्ये असलेल्या सर्व यंत्रणेची तपासणी व दुरुस्ती करून घ्यावी, जिल्ह्यातील वाहणाऱ्या नदीचे नैसर्गिक पत्र अतिक्रमणामुळे अरुंद झाले असेल तर तातडीने अतिक्रमण हटविण्याच्या सूचना ही विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. महानगरपालिका नगरपालिका यांनी शहरातील मान्सूनपूर्व सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यातील पाजर तलाव साठवण तलावाची दुरुस्ती करा
मराठवाड्यातील पाजर तलाव साठवण तलावाची देखभाल दुरुस्ती करावी तलावाच्या भिंतींना भेगा पडले असल्यास तातडीने दुरुस्ती करावी. तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठा होऊन तलाव फुटण्याची शक्यता लक्षात घेता या विभागाने तलावाचे बांधकाम केले त्या विभागाने तलावासाठी अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या सूचनेनंतर हिंगोली जिल्ह्यात प्रशिक्षण
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनंतर हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. औंढा नागनाथ येथील तलावांमध्ये पूरपरिस्थिती लक्षात घेऊन प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना बोटी द्वारे कसे बाहेर काढावे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात काय करावे या बाबत माहिती दिली जात आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.