आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनपूर्व तयारी बैठक:आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

मंगेश शेवाळकर| हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात आगामी पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व तयारी बैठकीत पापळकर बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सुर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची उपस्थिती होती.

यावेळी पापळकर म्हणाले की, मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणास सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा.

पोलीस प्रशासनाने पोलिस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूर प्रवण क्षेत्राबाबतचा नकाशा व माहिती तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी. तसेच धरणामध्ये पाण्याची आवक व जावक याबाबत माहिती दररोज कळविण्यात यावी, धरणातून पाणी सोडल्याने किती गावांमध्ये पूर परीस्थिती निर्माण होऊ शकते याबाबतही तात्काळ कळविल्यास मदतीसाठी वेळ मिळेल असेही यावेळी त्यांनी सांगितले.

महावितरणने जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची व लोंबकळणाऱ्या तारांची तपासणी करुन त्याची देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर परिस्थितीत गावामध्ये पाणी शिरल्यास येथील विद्युत पुरवठा खंडीत करणे तसेच सुरळीत करणे याबाबत योग्य नियोजन करावे.

आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणूक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...