आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीत 21 कोटींच्या कामांना दिली मान्यता, सरकार अडचणीत तरी वर्षा गायकवाडांकडून निधी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यामध्ये शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्य सरकार अस्थिर असतानाच पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी तब्बल २१ कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र गुरुवारी (२३ जून) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. या कामांच्या मंजुरीवरून भाजप आमदारांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेनेसोबतच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदार व नेत्यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून सरकार कुठल्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे राज्याचे राजकारण तापत असताना दुसरीकडे मात्र हिंगोलीच्या पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल २१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र आज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण ४३ कामांमध्ये बहुतांश कामे सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याची आहेत, तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना थर्मल फॉगिंग मशीन घेण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे राजकारण तापलेले असताना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी मात्र घाईगडबडीत २१ कोटी रुपयांच्या कामांना दिलेली मान्यता जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, हा निधी मार्च महिन्यात मंजूर झाला असताना या निधीतून कामाचे वाटप उशिराने झाल्यामुळे राजकीय वर्तुळातूनही आश्चर्य व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या प्रकरणात मात्र भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे समान वाटप झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. २१ कोटींच्या निधीपैकी आपल्या शिफारशीवरून केवळ दोन कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात आपण कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचेही आमदार मुटकुळे यांनी सांगितले. दरम्यान, याआधीही पालकमंत्र्यांनी निधी दिल्यानंतर वाद वाढला होता. निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.