आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दालनात भरली शाळा:शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात भरली शाळा

हिंगाेली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेनगाव तालुक्यातील जि.प. विद्यार्थ्यांचे आंदोलन - Divya Marathi
सेनगाव तालुक्यातील जि.प. विद्यार्थ्यांचे आंदोलन

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सोमवारी (२० जून) सकाळी ११.३० वाजता शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या दालनात शाळा भरवली.

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी असून त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची १३ पदे मंजूर आहेत. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून पाच पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्याध्यापकासह प्राथमिक पदवीधर, प्राथमिक शिक्षक व गणित व इंग्रजी विषयाचे दोन शिक्षक अशी पाच पदे रिक्त आहेत. गणित व इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.

दरम्यान, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी गावकरी रामनाथ चोडकर, दिगंबर महाजन, रामदास कऱ्हाळे, भागवत वाघ यांच्यासह गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले होते. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता विद्यार्थ्यांना घेऊन थेट जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गाठला. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या दालनातच शाळा भरवली.

१५ जुलैपर्यंत शिक्षकांची करणार भरती
ग्रामस्थांनी शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली, तर १५ जुलैपर्यंत शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये शाळेवर शिक्षक देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी दिले. मात्र त्यांचे तोंडी आश्वासन नको म्हणत गावकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. त्यावर दुपारी एक वाजेपर्यंत तोडगा निघाला नसल्याने गावकरी व विद्यार्थी सोनटक्के यांच्या दालनात ठाण मांडून होते. त्यानंतर दुपारी लेखी आश्वासन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...