आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात अंतर्गत कलहाने पोखरलेल्या काँग्रेसला भारत जोडो यात्रेनंतरही उभारी मिळत नसल्याचे चित्र आहे. दोन गटांना कंटाळलेल्या तिसऱ्या गटाने थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले, तर दुसरीकडे ‘हाथ से हाथ जोडो’ उपक्रमाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र बुधवारी (१८ जानेवारी) झालेल्या दोन बैठकांवरून स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आमदार डॉ. प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊराव पाटील यांचे दोन गट निर्माण झाले होते. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमधून बैठकांच्या वेळी घोषणाबाजी अन् वादाचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमधील वाद संपुष्टात येत नसल्याचे वरिष्ठ नेत्यांच्याही लक्षात आले होते. त्यामुळे निरीक्षक म्हणून आलेल्या नेत्यांना दोन वेळा बैठका घ्याव्या लागल्याचे चित्र होते.
काँग्रेसकडून हाथ से हाथ जोडो अभियान राबवले जात आहे. त्यासाठी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी कळमनुरी, हिंगोलीत बैठक घेतली. कळमनुरीच्या कार्यक्रमात हजर असलेले केवळ जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईच हिंगोलीत दाखल झाले. मात्र आ. डॉ. प्रज्ञा सातव यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. या वेळी चव्हाण यांनी नाराज झालेल्या गटाला शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या गटातील एका पदाधिकाऱ्याने चव्हाण यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.