आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यासह परभणी व नांदेड परिसरात चोरी, दरोडा टाकून ऊसतोडीला कर्नाटकात गेलेल्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कलबुर्गी शिवारातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर चोरी व दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. बंद असलेल्या घरांचे कुलूप कोंडे तोडून घरातील ऐवज पळवण्याचा सपाटा चोरट्याने लावला होता. याशिवाय दरोड्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकरणात चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, सुनील गोपींवार, जमादार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, शेख शकील, गणेश लेकुळे, विठ्ठल काळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, किशोर सावंत यांचे पथक स्थापन करण्यात आले. या पथकाला चोरीच्या घटनांमधील आरोपीचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांची पथक थेट कर्नाटकात कलबुर्गी शिवारात गेले व आरोपीला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या अन्य सहा जणांच्या शोध सुरू आहे. पोलिसांनी सध्या अटक केलेल्या चोरट्याचे नाव जाहीर केले नसून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येऊ शकतात.
शोधासाठी पथके रवाना हिंगोलीसह नांदेड व परभणी जिल्ह्यामध्ये चोरी व दरोडाचे प्रकरणांमध्ये आणखी सहा ते सात जण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मराठवाड्यातील विविध भागात रवाना करण्यात आले आहे. आरोपींच्या अटकेनंतरच सर्व प्रकरणी उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.