आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मंदिराच्या खोदकामात आढळली मूर्ती:औंढा नागनाथला 1200 वर्षांपूर्वीची भगवान कुंथुनाथांची मूर्ती सापडली

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ येथील जैन मंदिराच्या बांधकामासाठी पाया खोदताना जैन धर्मीयांच्या २४ तीर्थंकरांपैकी एक असलेल्या कुंथुनाथ भगवान यांची दगडाची मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती सुुमारे १२०० वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. जैन मुनींच्या मार्गदर्शनानंतरच या मूर्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे तेजकुमार झांझरी यांनी सांगितले.

झांझरी यांनी सांगितले की, औंढा नागनाथ येथे सुमारे १७०० वर्षांपूर्वीचे दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरात २४ तीर्थंकरासोबतच पार्श्वनाथ भगवान, आदिनाथ भगवान यांच्या मूर्ती आहेत. सध्या या मंदिराच्या परिसरात बांधकाम केले जाणार असून या कामाचे भूमिपूजन करून २६ जानेवारीपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. १५०० स्क्वेअर फूट आकारात या मंदिराचे बांधकाम होत असून या ठिकाणी मानस स्तंभ उभारला जाणार आहे.

पाया खोदकामात मंगळवारी सुमारे पाच ते सात फूट खोलीवर एक दगड आढळून आला. त्यामुळे अत्यंत सावकाशपणे खोदकाम केल्यानंतर ती मूर्ती निघाली. ही मूर्ती चोवीस तीर्थंकरांपैकी एक असलेल्या कुंथुनाथ भगवान यांची असल्याचे स्पष्ट झाले. मूर्ती पूर्णपणे दगडाची असून उंची सव्वापाच फुटांची आहे. सुमारे १२०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती असावी असा अंदाज आहे.

जैन मुनींच्या आज्ञेनंतर पुढील निर्णय
दरम्यान, औंढा येथे मंदिराच्या परिसरात मूर्ती सापडल्याची माहिती आचार्य विभवसागर महाराज, आचार्य विशेष सागर महाराज यांच्यासह जैनमुनींना दिली जाणार असून त्यांच्या आज्ञेनुसारच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे झांझरी यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...