आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Babanrao's Provocative Statement Those Who Smashed Traitors' Cars Will Be Honored By The Party Chief, Shiv Sena Workers' Gathering In Hingoli

गद्दारांच्या गाड्या फोडा आणि ठाकरेंकडून सन्मान घ्या!:हिंगोलीत शिवसेनेच्या मेळाव्यात बबनराव थोरातांचे चिथावणीखोर वक्तव्य

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत शिवसेने सोबत गद्दारी केलेल्या गद्दारांच्या गाड्या फोडण्याचे चिथावणीखोर आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सोमवारी ता. 1 येथे केले. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिंगोली येथील महावीर भवनात शिवसेेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गणाजी बेले, राजू चापके पाटील, संदेश देशमुख, विनायकराव भिसे पाटील, डॉ. रमेश शिंदे, माजी उपसभापती अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना थोरात म्हणाले की, शिवसेनेच्या बळावर आमदार झालेल्यांनीच पाठीत खंजीर खुपसला आहे. आता यांना रोखण्यासाठी आपल्याला गावा गावात उभे रहावे लागणार आहे. प्रत्येकाने आता पासूनच कामाला लागावे. शिवसेेनेच्या हिंगोली जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्यांनी त्यांच्या गावात गद्दारांच्या गाड्या आल्यास फोडण्याचे आवाहन करून गाड्या फोडणाऱ्यांचा मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी पक्ष बळकटीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहनही केले.

दरम्यान, यानंतर थोरात यांनी शिवसेनेत येण्यास इच्छूक असलेल्या इतर पक्षातील नेत्यांचीही भेट घेतली. त्यांच्या घरी चहापाणीही झाले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हयात शिवसेनेत इनकमींग सुरु होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नेत्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

हिंगोलीचे यापुर्वीचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी हिंगोलीच्या मेळाव्यात बोलतांना जिल्हा प्रमुख होण्यासाठी खिसा रिकामा करावा लागेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर नव्याने जिल्हा संपर्क प्रमुख झालेल्या बबनराव थोरात यांनी गद्दारांच्या गाड्या फोडण्याचे आवाहन केले. नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमधूनही संभ्रमाचे वातावरण दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...